इमारतीवरुन पडून कामगाराचा मृत्यू.

इमारतीवरुन पडून कामगाराचा मृत्यू; पेंटीग कॉन्ट्रॅक्टर विरुध्द गुन्हा
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः तळोजा येथील स्वर्ण जीवन इमारतीत रंगकाम करताना, चौथ्या मजल्यावरुन खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदर मृत पावलेल्या कामगाराला कॉन्ट्रॅक्टरने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचे साहित्य न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे आढळून आल्याने तळोजा पोलिसांनी या घटनेला संबधित कॉन्ट्रक्टरला जबाबदार धरुन त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर दुर्घटनेत मृत झालेल्या कामगाराचे नाव रावेंद्र भगवान शाहु (21) असे असून तो तळोजा फेज-2 मध्ये रहात होता. तसेच तो त्याच भागातील स्वर्ग जीवन या इमारतीचे रंगकाम करत होता. रावेंद्र शाहु आणि अरुण यादव असे दोघेजण सदर इमारतीच्या बी-विंग मधील मजल्यावर रंग काम करण्यासाठी टेरेसवरुन इमारतीच्या डक्टमध्ये उतरले होते. यावेळी डक्टमध्ये उभे राहण्यासाठी आडवे बांबू लावण्यात आले होते. रावेंद्र सदर डक्टमध्ये उतरल्यानंतर त्याच्या पाया खालचा बांबु तुटल्याने तो पहिल्या मजल्यावर खाली पडून गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर घटनेनंतर तळोजा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करुन दुर्घटनेचा सखोल तपास केला असता, स्वर्ण जीवन इमारतीच्या रंगकामाचा ठेका घेणारा पेंटीग कॉन्ट्रॅक्टर रणजीत डिगाल याने सदर इमारतीवर काम करणार्‍या कामगारांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले हेल्मेट, सीट हॉर्नेस (सेफ्टी बेल्ट), हँगींग रोप, आदि साहित्य पुरविले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे रावेंद्र भगवान शाहू रंगकाम करताना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तळोजा पोलिसांनी सदर घटनेला पेंटीग कॉन्ट्रॅक्टर रणजीत डिगाल याला जबाबदार धरुन त्याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.