शिवसेना भवन फोडु या वक्तव्याचे पनवेलमध्ये पडसाद कळंबोलीत शिवसैनिकांनी आ. प्रसाद लाड यांचा पुतळा जाळला

शिवसेना भवन फोडु या वक्तव्याचे पनवेलमध्ये पडसाद
कळंबोलीत शिवसैनिकांनी आ. प्रसाद लाड यांचा पुतळा जाळला
महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आंदोलन
पनवेल /प्रतिनिधी:- वेळ आली तरी शिवसेना भवन फोडु असे वक्तव्य भाजप विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केले होते. या वक्तव्याचा शिवसैनिकांनी खरपूस समाचार घेतला. याचे पडसाद पनवेलमध्ये सुद्धा पडले. कळंबोली मध्ये शिवसैनिकांनी रविवारी लाड यांचा पुतळा जाळुन त्यांच्या प्रतिभेला जोडे मारत घोषणाबाजी केली. महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेना आणि बीजेपी यांच्यामध्ये सातत्याने वाक्युद्ध सुरू आहे. परस्परांवर कुरघोडी करण्याच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांकडून संधी सोडली जात नाही. सीएम गेले उडत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याने ऐन महापुराच्या संकटामध्ये राजकिय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले होते. त्यावर शिवसेना मंत्री, आमदार त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिउत्तर दिले होते. हे वातावरण थंड होते तोच भाजपच्या आमदार  प्रसाद लाड यांनी  वेळ आली तर सेनाभवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य केलं .
दक्षिण मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथे आम्ही येणार आहोत.मोर्चाला आम्ही आल्यावर तिथे कुणी थांबणार नाही. सेनच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत, शिवसेनेला वाटत की आम्ही माहीम मध्ये आल्यावर सेनाभवन फोडू तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी यावेळी केलं. त्याचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रात उमटले आहेत. शनिवारी कळंबोली येथे शिवसेनेचे पनवेल महानगर रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कारमेल हायस्कूल चौकामध्ये दुपारी दोन वाजता आंदोलन केले. आमदार प्रसाद लाड यांचा पुतळा याठिकाणी जाळण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारले. भाजप आणि लाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसेनेने शिवसेना भवन फोडू या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, कळंबोली शहर प्रमुख डी.एन मिश्रा, सूर्यकांत म्हसकर, युवा सेनेचे अरविंद कडव, गिरीश धुमाळ, टिया आरोरा, बालाजी खोडेवाल यांच्यासह स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.

कोट
आमदार प्रसाद लाड हे मागच्या दरवाजाने आलेले आहेत. भाजप त्यांचे लाड पुरवत आहेत कारण ते घोटाळेबाज आहेत. मानवी तस्करी करणाऱ्यांनी शिवसेना भवन तोडण्याची भाषा करू नये. त्यांचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून शिवसेना भवन आहे. आणि ते आमच्या शिवसैनिकांचे मंदिर आहे. आमच्या श्रद्धा स्थानाबद्दल कोणी काही वक्तव्य करत असेल तर त्याला शिवसैनिक जशास तसे उत्तर देईल. जोपर्यंत प्रसाद लाड माफी मागत नाही तोपर्यंत त्यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आंदोलन सुरू राहील. त्यांना महाराष्ट्रात फिरून दिले जाणार नाही. लाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल कळंबोली शिवसेनेच्या वतीने निषेध म्हणून त्यांचा पुतळा जाळण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या प्रतिमेला जोडे सुद्धा मारण्यात आले.
रामदास शेवाळे
पनवेल महानगरप्रमुख शिवसेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *