शिवसहाय्य पनवेल तर्फे पी पी ई किट्स, ग्लोव्हज, सैनिटायझर व फेस मास्क यांचे मोफत वाटप

पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः कोरोना या भीषण विषाणूशी लढणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व पोलिस यांच्या प्रती खर्‍या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या संरक्षणासाठी शिवसहाय्य, पनवेल या संस्थेने अंगिकारलेला आपला समाजकारणाचा वसा पुढे नेताना पनवेल महापालिका, उपजिल्हा रुग्णालय, पनवेल महसूल प्रशासन आणि पनवेल पोलिस यांना उत्कृष्ट दर्जाच्या पी पी ई किट्स, ग्लोव्हज, सैनिटायझर व फेस मास्क यांचे मोफत वाटप केले.

या प्रसंगी महापालिका आयुक्त गणेश देशमुख, व उपायुक्त (मुख्यालय) जमीर लेंगरेकर यांनी देण्यात आलेल्या मान्यताप्राप्त पी पी ईच्या दर्जाची प्रशंसा केली. त्याच बरोबर प्रांत अधिकारी दत्तू नवले यांनी शिवसहाय्यच्या या कामाचे विशेष कौतुक देखील केले आणि पुढे ही अशी सामाजिक जाणीव ठेवून चांगले काम करत राहण्यास शुभेच्छा दिल्या. शिवसहाय्य, पनवेलचे संकेत शिरीष बुटाला यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमासाठी शिवसहाय्यच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला सढळ हस्ते मदत करणार्‍या, सामाजिक जाणीवा जागृत असणार्‍या दात्यांच्या सहकार्याने हा सामाजिक कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी शिवसहाय्य, पनवेल चे सुप्रसिद्ध डॉ.गौरव दवे, तसेच शिवसैनिक संकेत शिरीष बुटाला, राकेश अनिल टेमघरे, साईसुरज सुधाकर पवार, नितीन रामदास पाटील, प्रसाद दत्तात्रय पटवर्धन आणि अ‍ॅड.अमर दिलीप पटवर्धन हे उपस्थित होते. या आधीही शिवसहाय्य, पनवेल ने कोल्हापूर – सांगली येथील उद्भवलेल्या पुरप्रसंगात विविध गावात जाऊन मोफत वैद्यकीय तपासणी, चिकित्सा, औषधे वाटप अशी मदत केली होती. त्याच बरोबर गरीब अपंगांना तीन चाकी सायकल चे मोफत वाटप, गरजूंना मोफत अन्नदान व या कोरोना प्रसंगात मोफत अन्न पुरवणे असे अनेक सामाजिक कार्यक्रम हाती घेऊन पूर्णत्वास नेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *