‘समांतर-२’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद


हल्ली सर्वजण वेबसीरीजकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. हिंदी वेबसीरीजप्रमाणे मराठी वेबसीरीजनादेखील चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, ‘समांतर’च्या पहिल्या सिझनच्या यशानंतर दुसरा सिझन ‘एमएक्स प्लेयर’वर १ जुलै २०२१ रोजीदाखल झाला. पहिल्या सिझनला जो प्रतिसाद मिळाला त्याची पुनरुक्ती करत ‘समांतर’च्या दुसऱ्या सिझनलासुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंततिला ५६ दशलक्ष प्रेक्षकसंख्या प्राप्त झाली आहे. ‘एमएक्स प्लेयर’वर अलीकडेच ही वेबसिरीज सुरु झाली. या वेबसिरीजची निर्मिती जीसिम्स (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)ची असून या कंपनीचे प्रमुख अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार हे आहेत. ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. नितीश भारद्वाज, स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी या वेब सिरीजला दर्जा मिळवून दिला आहे. या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये रुपेरी पडद्यावरील ग्लॅमरस व्यक्तीमत्व सई ताम्हणकरसुद्धा महत्वाच्या भूमिकेत आहे.

या वेबसीरिजमध्ये अभिनेता स्वप्निल जोशी या मालिकेतील कुमार महाजन या प्रमुख व्यक्तीरेखेच्या भूमिकेत आहेत. “समांतर-२’ला भरभरून यश मिळणार याबाबत आम्हाला खात्री होती, कारण यातील सर्वच गोष्टी अचूकपणे जुळून आल्या आहेत. दुसऱ्या भागाला जो प्रतिसाद मिळतो आहे, त्याने मला खूप आनंद झाला आहे. मला याचाही आनंद आहे की मी माझ्या करियरमध्ये जे नवीन प्रयोग करत आहे त्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद लाभतो आहे. या सर्व यशाचे श्रेय खासकरून निर्माते अर्जुन आणि कार्तिक यांना तसेच दिग्दर्शक समीर विद्वांस यांना आहे. त्यांनी सर्जनशिलतेच्या बाबतीत जे श्रम घेतले आणि चित्रीकरणाच्या बाबतीत जो दर्जा सांभाळला त्याला तोड नाही,” असे उद्गार अभिनेता स्वप्निल जोशी यांनी काढले आहेत.

स्वप्निल यांनी पहिल्या सिझनच्यावेळी ‘समांतर’ची संपूर्ण टीम कोल्हापूर येथे आलेल्या पुरामध्ये १३ दिवस कशी अडकून पडली होती, याची आठवण उधृत केली आहे. “कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात ऑगस्ट २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. संपूर्ण जिल्हे जलमय झाले होते. आम्ही तेव्हा ‘समांतर-१’चे चित्रिकरण कोल्हापूर येथे करत होतो. या पुराचा कहर एवढा मोठा होता की संपूर्ण चमू तब्बल १३ दिवस एका हॉटेलमध्ये अडकून पडला होता. त्यावेळी अर्जुन आणि कार्तिक यांनी संपूर्ण चमूची काळजी घेत आम्हा कोणालाही कशाचाही त्रास होणार नाही, असे पहिले. ते दिवस विसरता येण्यासारखे नाहीत. आज चित्रिकरणादरम्यान जेव्हा कधी त्या दिवसांची आठवण होते, तेव्हा अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो,” असे अनेक किस्से त्याने सांगितले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *