तीन कोटीचे कर्ज देण्याच्या बहाण्याने ७ लाख रुपये उकळणार्‍या भामट्याचा पोलिसांकडून शोध सुरु


तीन कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने सीबीडीत राहणार्‍या एका व्यावसायिकाकडून ७ लाख रुपये उकळून त्यांना कुठल्याही प्रकारचे कर्ज न देता त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकिस आली आहे. विशेष म्हणजे या भामट्याने सदर व्यवसायीकाला बनावट व खोटे बँक स्टेटमेंट दाखवून त्यांच्याकडून सदरची रक्कम उकळल्याचे उघडकीस आले आहे. सीबीडी पोलिसांनी या भामट्या विरोधात फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार दिपक अनाजे (४२) हे सीबीडी बेलापुर येथील आग्रोळी गावात राहण्यास असून त्यांचा अलिबाग येथे कोळंबी पालनाचा प्रकल्प आहे. याच व्यवसायासाठी त्यांना भांडवलाची गरज होती. त्यामुळे वर्षभरापुर्वी अनाजे एका चांगल्या फायनान्सरच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना संदिप अनंत धनावडे हा भांडवल मिळवुन देत असल्याची माहिती मिळाल्याने अनाजे यांनी त्याची भेट घेतली होती. तसेच त्यांना १ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी संदिप धनावडे याने त्याच्याकडून किमान ३ कोटी रुपये घ्यावे लागतील तसेच घेतलेल्या भांडवलावर महिन्याला १ टक्का व्याज द्यावे लागेल असे सांगितले होते. दिपक अनाजे यांना भांडवलाची गरज असल्याने त्यांनी ३ कोटीवर महिना एक टक्का व्याज देण्याची तयारी दर्शविल्यानंतर संदिप धनावडे याने दिपक अनाजे यांच्यासोबत करारनामा देखील करुन घेतला. त्यानंतर धनावडे याने ७ डिसेंबर २०२० रोजी दिपक अनाजे यांना फोन करुन त्यांना देण्यात येणारी ३ कोटीची रोख रक्कम पुण्यातील हिंजवडी येथून बेलापुर येथे आणण्यासाठी पुण्यातील कंपनीच्या अधिकाऱयांना ४ लाख रुपये कमिशन द्यावे लागतील असे सांगितले. त्यामुळे दिपक अनाजे यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून ४ लाख रुपये त्याने दिलेल्या बँक खात्यात पाठवुन दिले. मात्र त्यानंतर ३ कोटीची रक्कम न मिळाल्याने दिपक अनाजे यांनी धनावडे याला संपर्क साधला. यावर त्याने पुण्यातील कंपनीत तांत्रिक अडचण झाल्याचे व त्यांचे पैसे दहा ते पंधरा दिवसात मिळतील असे सांगितले. त्यानंतर देखील त्याने अनाजे यांना पैसे दिले नाही. उलट त्याने त्याच्या बँक खात्यात भरपुर पैसे असल्याचे व इन्कम टॅक्स विभागाने त्याचे दोन्ही बँक खाते गोठविल्यामुळे त्याला पैसे काढता येत नसल्याचे कारण सांगत, पुण्यातील कंपनीला आणखी ३ लाख रुपये कमिशन पाठवुन देण्यास सांगितले. त्यासाठी भामट्या धनावडे याने त्याच्या दोन्ही बँकेचे बनावट स्टेटमेंट दिपक अनाजे यांच्या व्हॉटसऍपवर पाठवून दिले. धनावडे याने पाठविलेल्या बनावट बँक स्टेटमेंटमधील एका खात्यात ३३ कोटी तर दुसर्‍या खात्यात ८ कोटी रुपये असल्याचे निदर्शनास आल्याने अनाजे यांचा धनावडेवर विश्‍वास बसला. त्यामुळे त्यांनी आणखी ३ लाख रुपये पाठवून दिले. त्यानंतर दिपक अनाजे यांनी धनावडेकडे वारंवार कर्ज रक्कमेची मागणी केली. मात्र त्याने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. त्यामुळे दिपक अनाजे यांनी धनावडे याने पाठविलेल्या बँक स्टेटमेंटची बँकेकडून पडताळणी केली असता, ती बनावट व खोटे असल्याचे आढळून आले. यावरून संदिप धनावडे याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर दिपक अनाजे यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *