तहसील कार्यालयातील अरेरावी करणाऱ्या महिला कर्मचारीला समज देण्याची पनवेल क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनची मागणी


सरकारी कामांना वेळ लागणे हे प्रत्येक नागरिकाला सवयीचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांवर होणाऱ्या या अन्यायाकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, पनवेल तहसील कार्यालयात कर्मचारी वर्गाचा मनमानी कारभार चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. तहसील कार्यालयात कामास्तव येणाऱ्या नागरिकांशी अरेरावीची भाषा तसेच, उद्धट उत्तरे देऊन काम करण्यास नकार देत उद्या या , परवा या अशाप्रकारे बोलणे करण्यात येत असल्याचे क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या लक्षात आले. या अरेरावी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वारंवार घडणाऱ्या घटनांवर आळा बसण्यासाठी १४ जुलै २०२१ रोजी पनवेल तहसीलदार विजय तळेकर साहेब यांस पत्राद्वारे निवेदन देण्यात आले.

याशिवाय, २९ जून २०२१ रोजी असाच एक प्रकार क्रांतीज्योत महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष मा.सौ.रुपालीताई शिंदे यांच्यासमोर प्रत्यक्ष घडला. त्यावेळी एक गरीब महिला तिच्या कामास्तव तिथे आली होती. तहसील कार्यालयातील राजीव गांधी योजनेच्या अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचारी अव्वल कारकून महिला कर्मचारी यांनी त्या महिलेशी हुज्जत घालत तिला उलट उत्तरे देत. “आता २ वाजले आहेत,जेवणाची वेळ झाली आहे,उद्या या”, असे सांगण्यात आले. मात्र जेवणाच्या वेळेला दहा मिनिटे असून देखील कामचुकारपणा करत त्या महिलेशी असभ्य भाषेत बोलत तिला जाण्यास सांगितले. त्यामुळे ह्या अशा कर्मचाऱ्यांना याठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे का? , असा गंभीर प्रश्न याठिकाणी उद्भवतो. याशिवाय असे असेल तर तुम्ही पगार कोणत्या कामाचा घेता? कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी किंवा अन्य कोणत्या व्यक्तींशी सौजन्याने बोलणे तुमचे कर्तव्य आहे, ते तुम्ही का पाळत नाही? तहसील कार्यालयात कामानिमित्त जास्त गर्दी असतेच. मग यावरुन हेच सिद्ध होते की, प्रत्येकालाच अशाप्रकारची उत्तरे देण्यात येत असावीत. त्यामुळे महोद्य आपण यावर विचार करावा ही नम्र विनंती पनवेल क्रांतीज्योत महिला फाउंडेशनतर्फे पनवेल तहसीलदार विजय तळेकर साहेब यांस करण्यात आली.याशिवाय घडलेल्या सर्व प्रकाराची पुरावे म्हणून चित्रफित आहे, याची दखल घ्यावी. तसेच लवकरात लवकर यावर कारवाई करावी आणि संबंधित कर्मचारीला समज देण्यात यावी अशी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन तहसीलदारांना सादर करताना क्रांतीज्योत महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष मा.सौ.रुपालीताई शिंदे , खजिनदार मा.सौ.किरण अडागळे, सदस्या मा.श्रीमती स्नेहा धुमाळसह पत्रकार गुरुनाथ भोईर आणि त्यांचे सहकारी इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *