कर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार ..

कर्नाळा बँक घोटाळ्यात शेकापचे इतर नेतेही भागिदार आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने पैसे काढले आमदार प्रशांत ठाकूर यांचा गंभीर आरोप महाविकास आघाडी सरकारवरही सोडले टिकास्त्र

पनवेल (प्रतिनिधी) कर्नाळा बँक घोटाळा हा केवळ ६५ खात्यांपुरता मर्यादीत नसून त्याचे पालेमुळे खोलवर आहेत. या घोटाळ्यामध्ये शेकापचे इतर नेते सुध्दा भागिदार आहेत. आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने ओव्हर ट्राफने पैसे काढण्याचे आल्याच्या इंट्री आमच्या हाती लागल्या आहेत. असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडीकडून माजी आमदार विवेक पाटील यांना पाठीशी घातले गेल्याचे सांगत राज्य सरकारकडून टिकास्त्र सोडले. मंगळवारी रात्री ईडीने कर्नाळा बँकेतून मनी लँड्रीग केल्याच्या आरोपावरुन माजी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी आज (दि. १६) पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महा विकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह मला विधानसभेच्या पायऱ्यावर बसावे लागले. त्यावेळी सहकार मंत्र्यांनी भेट घेऊन याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पाळले गेले नाही. राज्य सरकार याबाबत टाळाटाळ करत असल्याचे आमच्या लक्षात आले होते. सुदैवाने पैशांची अफरातफर झाल्याचे ईडीच्या लक्षात आले. त्यानुसार माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाली असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे ठेवीदारांना विश्वास निर्माण झाला आहे. विवेक पाटलांना अटक झाली ती ६३ ते ६५ पुरते मर्यादित आहे. या पलीकडे जाऊन यामध्ये आणखी गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस येत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने २००२ आणि २००५ या कालावधीमध्ये ओव्हर ड्राफ्ट ने पैसे काढण्यात आले आहेत. त्यांचे नाव ६३ जणांच्या यादीमध्ये कुठेच नाही. असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. आम्ही गेल्या दोन वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना ओरडून सांगतोय की तुम्ही या प्रकरणी आवाज उठवा. तुमचे कार्यकर्ते मतदार यांच्या पैशांचा गैरव्यवहार झालेला आहे. परंतु त्यांच्या नेत्यांनी याबाबत एक चकार शब्द सुद्धा काढला नाही. उलट शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या बॅनरवर आजही विवेक पाटील यांचा फोटो आहे. ज्यांनी सर्वसामान्य ठेवीदारांचे ५०० कोटींपेक्षा रुपये हडप केले आहेत. गैरवापर करणाऱ्या विवेक पाटील यांना शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी पाठीशी घालत असल्याचा आरोप आ. ठाकूर यांनी केला. या गैरव्यवहारात मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या इतर नेत्यांना सुद्धा लाभ झाला असल्याचे आ.प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. विवेक पाटील यांना पाठीशी घालणारे, या गैरव्यवहारांमध्ये भागीदार असणाऱ्यांने याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. कर्नाळा नागरी सहकारी बँक आर्थिक घोटाळ्यात राज्य सरकारने अक्षरशः दुर्लक्ष केले असून ईडीने केलेल्या कारवाईमुळे ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे, जो पर्यंत ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाहीत, तो पर्यंत आमचा लढा कायम असेल, अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पुढे बोलताना कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले कि, कर्नाळा सहकारी बँकेतील खातेदार, ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने अनेक ग्राहक भयभित झाले. सप्टेंबर २०१९ मध्ये ठेवीदारांनी, ग्राहकांनी आमच्याकडे येऊन आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी केली. जनतेचा लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याचा निश्चय केला, त्या अनुषंगाने आम्ही लक्ष घातले आणि या कामी आम्हाला माजी खासदार किरीट सोमैय्या यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सुरुवातीला बँकेत कुठलाच घोटाळा नाही अशी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील आणि बँकेने छातीठोकपणे सांगत पैसे परत देतो, अशी अनेक आश्वासने ठेवीदारांनी दिली. काही काळ लोटल्यानंतरही ठेवीदारांना पैसे परत मिळाले नाहीत आणि विवेक पाटीलांनी दिलेली आश्वासने हवेत विरली. त्या दरम्यान विधानसभा निवडणूक होती आणि हि निवडणूक झाल्यानंतरही पैसे देण्यास टाळाटाळ सुरूच राहिली. त्यामुळे ठेवीदारांना पैसे मिळवून देण्याचा रेटा आम्ही लावला. बँकेची चौकशी करण्याची मागणी पूर्वीच केली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही नियमानुसार कार्यवाही करायला सुरुवात केली. राज्याचे गृह विभाग, विधिमंडळ, सहकार आरबीआय, ईडी, सीआयडी, यांच्याकडे पाठपुरावा करण्याबरोबरच आंदोलन, मोर्चे करून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) विशेष लेखापरीक्षण करून सहकार आयुक्तांना अहवाल दिला होता. सहकार आयुक्तांनी या अहवालाची तपासणी करून हा घोटाळा झाल्याचे स्पष्ट केले. त्यांनतरही कार्यवाहीला गती मिळाली नाही, त्याचबरोबर राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या यंत्रणांनीही कायम दुर्लक्ष केले. आरबीआयकडे हा विषय गेला असताना त्यांच्याकडूनही दुर्लक्ष होत असल्याची जाणीव झाल्याने मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ठेवीदारांसह जोरदार मोर्चा केला. त्याच अनुषंगाने पनवेलमध्ये कर्नाळा बँकेवरही मोर्चा नेवून ठेवीदारांचे पैसे द्या असा टाहो फोडला. विधिमंडळात आवाज उठविला, सहकार खाते, गृहखात्याकडे या संदर्भात दादा मागितली. अर्थातच महाविकास आघाडीतील घटक असल्यामुळे विवेक पाटील यांच्यावर कारवाई होण्यास टाळाटाळच होत राहिली. गृहमंत्री विरोधी पक्षावरील कारवाईला तातडीने मंजुरी देते मात्र या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाणूनबुजून टाळाटाळ केली. त्यानंतर सीआयडीकडे आम्ही दाद मागितली तेथेही एवढ्या मोठ्या घोटाळ्याच्या चौकशीला उशीर लावला गेला. राज्य शासन या बाबतीत ठेवीदारांना न्याय देणार नाही आम्हाला खात्रीच पटली. त्यामुळे याचा तपास ईडीने करावी अशी आम्ही जोरदार मागणी व पाठपुरावा केला. काल झालेल्या ईडीच्या कारवाईमुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घोटाळ्यातून विवेक पाटील यांनी पैसे कसे लंपास केले याचा शोध समोर येईलच. पण ठेवीदारांचे पैसे त्यांनी परत करावेत, हि आमची आग्रही मागणी असून त्यासाठी आमचा कायम पाठपुरावा आणि संघर्ष राहील, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
१८ ऑगस्ट २०१९ रोजी दैनिक निर्भीड लेखने विवेक पाटील यांची बाजू मांडत कर्नाळा बँकेत घोटाळा नाही अशी जाहीर प्रसिद्धी केली होती. त्या संदर्भात पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले कि, आमची समिती पहिल्या तक्रारीपासून या विषयात ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून काम करीत आहे, मात्र कांतीलाल कडू त्यांच्या समितीने बोभाटा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे त्यात विवेक पाटीलांचाच एक कार्यकर्ता हाताशी घेऊन विवेक पाटलांना वाचवण्याचा आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर आता कारवाई होणार आहे असे चित्र समोर येत असताना ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोय असा आभास कडू नि निर्माण केला, असे सांगतानाच आम्ही श्रेय घेण्यासाठी नाही तर ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत त्यामुळे ठेवीदारांची दिशाभूल करण्याचा वाईट प्रयत्न करू नका, असा सल्लाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिला.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे २ मार्च १९९६ पासून संचालक होते. मात्र आपल्या कामातून त्यांना वेळ मिळत नसल्याने त्यांनी स्वत:च संचालक म्हणून काम करण्यास असमर्थतता व्यक्त केली. त्यामुळे त्यांचे नाव संचालक मंडळातून ११ जून १९९७ रोजी कमी करण्यात आले. त्यामुळे त्यांनी कर्नाळा बॅंकेवर संचालक म्हणून केवळ नऊ महिने सहा दिवसच काम केले होते. त्यानंतर त्यांनी कधीही कर्नाळा बॅंकेचे संचालक अथवा पदाधिकारी म्हणून बँकेच्या कारभारात सहभाग घेतला नाही. असे असतानाही कांतीलाल कडू यांनी कुठलीही माहिती न घेता फक्त ढिंढोरा केला. चौकशीच्या अनुषंगाने कर्नाळा बॅंकेच्या आर्थिक घोटाळ्याशी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने कर्नाळा बॅंकेचे चौकशी अधिकारी आणि सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधवर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दोषमुक्त करुन त्यांचे नाव या चौकशीतून वगळण्याचा निर्णय एका आदेशानुसार जाहिर केला आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव कोणत्या ना कोणत्या खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा खोटेपणा करणाऱ्यांचे पितळ उघडे झाले, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी नमूद केले. ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी गृह खात्याने लक्ष घालणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही भ्रष्टाचाराला वाचविण्यासाठी सुरुवातीपासूनच महाविकासआघाडीचे प्रयत्न झाले आहेत, येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात कार्यवाही व्हावी, यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी यांनी परिषदेत माहिती देताना म्हंटले कि, १७ शाखांचा कारभार राहिलेल्या या बँकेत जवळपास ४० हजार खातेदारांचे पैसे अडकले. तरी सुद्धा उजळ माथ्याने विवेक पाटील फिरत राहिले कारण त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबाच होता. त्यामुळे एवढा मोठा घोटाळा असतानाही शेकापचे आणि महाविकस आघाडीच्या पुढाऱ्यांनी या घोटाळ्याविरोधात आवाज उठविला नाही. ५२९ कोटी ३६ लाख ५५ हजार २६ रुपयांच्या कर्नाळा बँक आर्थिक घोटाळ्यामुळे अनेक जणांना स्वतःच्या पैशाअभावी प्राण गमवावे लागले. अनेकांचे आजाराने निधन झाले, अनेकांना वैद्यकीय उपचार घेता आले नाहीत. त्याचबरोबर अनेकांची विवाह, मंगलकार्यसुद्धा झाली नाहीत. या आणि अशा अनेक कारणाने हा बँक घोटाळा राज्यभरात गाजला मात्र तरीसुद्धा महाविकास आघाडी सरकारने याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. आम्ही ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची भूमिका कायम ठेवली कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल हि ठाम भूमिका घेत सततचा पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने काल ईडीने विवेक पाटीलांवर कारवाई केली आहे हा लढा इथे थांबणार नाही तर ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देईपर्यंत राहणार आहे, असे महेश बालदी यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या काळात जाहीर भाषणात ‘विवेक पाटील यांनी मला कुणीही अटक करणार नाही’ अशी गर्जना केली होती मात्र आम्हीही चॅलेंज दिले होते ‘विवेक पाटलांची अटक अटळ आहे आणि ती होणारच’. आणि ती झाली. असेही आवर्जून उल्लेखित केले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील आदी उपस्थित होते.

कोट-
विवेक पाटलांना अटक होणार हा माझा शब्द खरा ठरला

उरण विधानसभा मतदारसंघ मी आणि पाटील निवडणूक लढलो. ते तीन नंबर वर फेकले गेले. विवेक शंकर पाटील यांना अटक होणार असा शब्द आपण निवडणुकीच्या कालावधीमध्ये ठेवीदारांना दिला होता. कालच्या ईडीकडून झालेल्या अटकेने तो खरा ठरला असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. मोहपाडा येथे झालेल्या सभेत मला कोणाचाही बाप आला तरी अटक होऊ शकत नाही. अशा प्रकारे छातीठोकपणे विवेक पाटील सांगत होते. माझे वडील आणि त्यांचे वडील वरती गेल्या आहेत. त्यांचा विषय नाही मात्र तुम्ही आणि तुमचा मुलगा नक्कीच आत मध्ये जाल असे जाहीरपणे मी सांगितले होते ते खरे ठरले असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *