कामोठे वासियांच्या समस्या निवारण्यासाठी नगरसेवक विकास घरत आक्रमक.

कामोठे वासियांच्या समस्या निवारण्यासाठी नगरसेवक विकास घरत आक्रमक

अधिकाऱ्यांना धारेवर धरताच कामे लागली मार्गी

कामोठे वसाहतीमधील सेक्टर 34 मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत.येथील सांड पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या जीर्ण झाल्याने टाक्या मलमुत्राने ओथंबून वहात आहेत.याची तक्रार करून सुध्दा समस्या जैसे थे असल्याचे पाहून नगरसेवक विकास घरत आक्रमक झाले. रहिवाशांच्या सह थेट सिडको कार्यालयात धडक देत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेताच कामे मार्गी लागली आहेत.
त्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नगरसेवक विकास घरत म्हणाले की, सांड पाण्याच्या टाक्या सेक्टर 34 परिसरात वाहत असल्याने अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे. त्यावर घोंगावणार्‍या माशा आणि 24 तास वाहणारे सांडपाणी यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.हेच पाणी पिण्याच्या पाण्यात देखील मिसळते त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.याशिवाय येथील चेंबर वरची झाकणे नाहीशी झाली आहेत,पदपथ अपूर्ण अवस्थेत आहेत. अशा सगळ्या समस्यांसाठी नागरिकांनी तक्रारी करून, आम्ही पाठपुरावा करून देखील कामे होत नसतील तर मला रुद्रावतार धारण करावा लागेल. आज येथील समस्याग्रस्त नागरिकांना घेऊन मी कामोठे सिडको कम्युनिटी सेंटरमध्ये कार्यकारी अभियंता विलास बनकर यांची भेट घेतली.आठ दिवसात नवीन पाईप टाकण्याचे काम सुरू होईल.तोपर्यंत जेट मशीन,आणि सक्शन मशीन द्वारे टाक्या साफ केल्या जातील.
घरत पुढे म्हणाले की, खरे तर या समस्या आणि या व्यतिरिक्त अन्य भेडसावणारे प्रश्न यासाठी आम्ही सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा दिवसापूर्वी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. परंतु अधिकाऱ्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीतून जर प्रश्न सुटणार नसतील तर आम्हाला आक्रमक व्हावे लागेल.ठेकेदार जर कामे करत नसतील तर त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याची जबाबदारी सिडको अधिकाऱ्यांची आहे. परंतु बहुतांश वेळेला जर समस्या निर्माण झाल्या तर ठेकेदार यांच्यासोबत नागरिक आणि आम्ही लोकप्रतिनिधी यांचे वाद होत असतात.
कार्यकारी अभियंता बनकर यांनी पाईपलाईन बदलण्याचे कामाचे बाबत प्रशासकीय मंजुरी आलेली असून आठ दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल असे आश्वासन दिले. तसेच मेनहोल वरती फ्रेम व झाकण बसवण्याचे काम तातडीने सुरू होईल असे देखील सांगितले. यावेळी नगरसेवक विकास घरत यांच्यासमवेत नगरसेवक डॉक्टर अरुण भगत व सेक्टर 34 मधील रहिवासी उपस्थित होते.

चौकट

सगळ्या समस्या जर का कूर्मगतीने सुटत असतील तर याला सिडको आणि पनवेल महानगरपालिका प्रशासन दोघेही तितकेच जबाबदार आहेत. 2017 मध्ये पनवेल महानगरपालिका आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाला येथील समस्यांची पुरेपूर जाण आहे. परंतु हस्तांतरण प्रक्रियेमध्ये आणि लाल फितीमध्ये जर का समस्या जशाच्या तशा राहणार असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ते कधीही सहन करणार नाही. माझे असे ठाम सांगणे आहे की सिडकोने प्रथम सर्व सेवा सुविधा दोषमुक्त कराव्यात,आणि मगच पनवेल महनगर पालिकेला हस्तांतरीत कराव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *