कामोठेत कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी रामदास शेवाळे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र
पनवेल, दि. 29 (वार्ताहर): कामोठे वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण तुलनेत जास्त सापडत आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात चाकारमानी राहत असल्याने त्यापैकी काही अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी मुंबईला जातात. त्यातील काही जणांना संसर्ग झाला आहे. हा महामारी रोग नियंत्रणात आणण्यासाठी तसेच त्याचे संक्रमण थांबवण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेने ठोस पावले उचलावीत अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी मनपा आयुक्तांना पत्र दिले आहे.
पनवेल परिसरातून मुंबई अत्यावश्यक सेवा देण्यासाठी जाणार्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष करून कामोठे वसाहतीत अशाप्रकारे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत. याचे प्रमुख कारण असे की दोन रेल्वे स्थानक आणि पनवेल-सायन महामार्ग बाजूला असल्याने नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईला जाणार्या चाकरमान्यांनी कामोठे वसाहतीला पसंती दिलेली आहे. याठिकाणी त्यांची संख्या मोठी आहे. आता अत्यावश्यक सेवेकरिता मुंबईत जाणार्या काही कामोठेकरांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी याच वसाहतीत राहणार्या एका मुंबई पोलीस कर्मचार्याचे दुःखद निधन झाले. त्यामुळे वसाहतीत भीतीचे आणि भयाचे वातावरण आहे. कामोठे रोज सापडणार्या रुग्णांमुळे कोरोना विषाणूंचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वसाहतीत पनवेल महानगरपालिकेने आता कोरोना वर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत रामदास शेवाळे यांनी व्यक्त केले आहे.
दवाखाने व मेडिकल शॉप वगळता वसाहत पूर्णपणे बंद ठेवावी. काही दिवस मेडिकल शॉप व दवाखाने वगळता कामोठे वसाहत पूर्णपणे बंद करण्यात यावी असा प्रस्ताव शिवसेनेकडून प्राधिकृत अधिकारी म्हणून महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे. जेणेकरून कोरोना ची साखळी तुटेल. असा महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मुंबई अत्यावश्यक सेवा देण्याकरीता जाणार्यांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही वेगळे धोरण राबवता येईल का? याचाही प्रशासनाने विचार करावा अशी मागणी रहिवाशांच्या वतीने शेवाळे यांनी केली आहे.
महापालिका प्रशासनाचे कौतुक
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात महापालिका प्रशासन कोरोना संसर्ग विरोधात चांगले काम करीत आहे. प्रशासनाचे उत्तम नियोजन असल्याने स्थानिक पातळीवर कोरोनाचा सामूहिक संसर्ग झालेला नाही. त्याबद्दल प्रशासनाचे करावे कौतुक तितके कमीच आहे. असे पत्रात नमूद करण्यात आले आहे