दि बा पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ.

दि.बा.पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ.

कर्तृत्ववान कार्यकुशल अशा दि बा पाटील यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांचे नाव विमानतळाला दिले गेले पाहिजे.-रविशेठ पाटील

नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचे दी बा पाटील यांचे? की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे? हा वाद सध्याचे घडीला चिघळत आहे. एकीकडे स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त यांनी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून व्यापक आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको च्या खांद्यावर बंदूक ठेवून सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव पारित करून घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने श्री साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष तथा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी चे उपाध्यक्ष रवीशेठ पाटील यांच्यासोबत चर्चा केली असता दि बा पाटील यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती करता आदरणीय व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे, तसा तो माझ्या मनात देखील आहे. त्यांच्या निधनाचे दुःखद वृत्त समजताच माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, जे एम म्हात्रे यांच्यासमवेत मी देखील त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालो होतो. रणरणत्या उन्हात सात किलोमीटरची अंत्ययात्रा चालून जात असताना त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यांचा जनसागर आम्ही अनुभवला आहे. परंतु आमच्या भूमीमध्ये आमच्या जमिनी आणि आमची उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या शेती जेव्हा अधिग्रहित करून या ठिकाणी प्रकल्प उभा राहत असेल तर त्याला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे. सत्तरच्या दशकामध्ये आलेल्या सिडको आस्थापनाने आमच्या जमिनीच्या बदल्यात अत्यल्प मोबदला देऊ गेला होता. आज जर लोकनेते दि बा पाटील साहेब यांनी आमचे आंदोलनाच्या माध्यमातून नेतृत्व केले नसते तर कदाचित सातारा जिल्ह्यापलीकडे कुठेतरी आम्ही खितपत पडलो असतो. विमानतळाला नाव देताना सरकारने येथील जनमानसात उमटणारा सूर लक्षात घेतला पाहिजे. लोकांच्या वेदना, भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी भूमिपुत्रांचे दैवत अशा लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला दिले गेले पाहिजे.

चौकट
आठवणीतील दि.बा…

दि बा पाटील यांच्या समवेत अनेक आंदोलने, मोर्चे यात सहभागी झालेले आणि त्यांच्या सह संघटनेचे काम केले असलेले रवीशेठ पाटील म्हणाले की, शिवनेरी एंटरप्राइजेस येथे कार्यरत असताना खुद्द दि.बा. पाटील साहेबांच्या इंटर जिपचे सारथ्य करण्याचे भाग्य मला लाभले. वास्तविक दि.बा.पाटील हे इतके महोत्तम व्यक्तिमत्व होते की त्यांच्या संपर्कात जो जो आला त्याचा उद्धार झाला. एक निष्णात विधी तज्ञ व त्या योग्य असणारा सखोल अभ्यास त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व उजळून निघाले होते. भाषेवर अतिउत्तम पकड, सुस्पष्ट आणि शुद्ध बोलणे यामुळे त्यांचा समोरच्यावरती चटकन प्रभाव पडत असे. आज केवळ स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते या एका व्याख्येत त्यांना अडकवता येणार नाही. कारण त्यांनी दोन वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून दिल्लीत जाऊन प्रभावी कामगिरी केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासमवेत काम करून त्यांनी आपल्या विभागातील लोकांच्या समस्या सोडविल्या आहेत. इतकेच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत देखील त्यांनी झोकून देऊन काम केले होते. आमच्यासाठी दैवतसमान असणाऱ्या अशा दिग्गज नेत्याचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले गेलेच पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *