ज्येष्ठ नागरिकाला लुबाडणार्‍या त्रिकुटास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले गजाआड..

ज्येष्ठ नागरिकाला लुबाडणार्‍या त्रिकुटास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केले गजाआड
पनवेल, दि.26 (संजय कदम) ः ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून लुबाडणार्‍या तीन अनोळखी इसमांना गजाआड करण्यास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाला यश आले आहे.
खांदेशवर पोलीस ठाणे हद्दीत तीन अनोळखी इसमानी 85वर्ष वयाचे ज्येष्ठ नागरिक असलेल्या फिर्यादी यांच्या दुकानांमध्ये घुसून त्यांना लोखंडी पाईपने मारहाण करून जबरी चोरी केल्याने सदर बाबत खांदेश्‍वर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.क्र 115/21 कलम 394,452,34 भा.द.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरच्या संवेदनशील गुन्हा उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वपोनि गिरीधर गोरे व त्यांचे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व बातमीदार यांच्या मदतीने सदर गुन्हयातील तिन्ही आरोपी निष्पन्न केले. पो.ह.  सुनील कुदळे यांना मिळालेल्या बातमी अन्वये गुन्हयातील वापरेलली ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली. त्याच दरम्यान गुन्ह्यातील तिन्ही आरोपी हे गुन्हा केल्यानंतर राज्य-उत्तर प्रदेश येथे  पळून गेले असल्याचे निष्पन झाले. त्यांचे मोबाईल नंबर प्राप्त करून त्याचे लोकेशन व मुंबई मधून त्याचवेळी उ.प्र. ला जाणार्‍या ट्रेन चे लोकेशन तपासले असता ते दोन ट्रेन शी समांतर असल्याचे आढळून आले.
अपर पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शन व प्रयत्नाने युपी जीआरपीएफ यांच्याशी सतत संपर्क ठेवून पाटलीपुत्र व वाराणसी एक्सप्रेस या दोन्ही ट्रेन जीआरपीएफच्या मदतीने सतना व प्रयागराज या ठिकाणी चेक करून आरोपीचा शोध घेतला तसेच वाराणसी रेल्वे स्टेशन येथेही तेथील जीआरपीएफ यांच्या मार्फत आरोपीचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. तरीही तिन्ही आरोपीचा सतत माघ घेऊन ते उत्तर प्रदेश येथील जिल्हा भदोई, चौरी, या गावी पोहचताच तेथील मुखीया व पोलीस यांच्याशी सपंर्क करून तिन्ही आरोपी ट्रेस करून त्यांना चौरी पोलीस ठाणे यांच्या मार्फत आरोपी रोशन गटुर कुमार (20 रा.आदई गाव), सहमत आमरु अन्सारी (22 रा.कामोठे), शहनवाज मोहम्मद शेख उर्फ शानू (35, रा.नवीन पनवेल)  ताब्यात घेतले. यातील आरोपी शहानवाज उर्फ शानू, हा अभिलेखा वरील गुन्हेगार आहे. त्यानंतर गुन्हे शाखा कक्ष 2 चे  व खांदेश्‍वर पोलीस ठाण्याचे संयुक्तिक पथक उ.प्र. येथे पाठवून नमूद आरोपींना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या आरोपींना अटक करण्यामध्ये सपोनि गणेश कराड, सपोनि प्रवीण फडतरे, पोउपनी मानसिंग पाटील, पोउपनी वैभव रोंगे, पो हवा सुनील कुदळे, पोशी अजिनाथ फुंदे व पथकाने विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *