नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिले गेले पाहिजे..

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव दिले गेले पाहिजे

  • नगरसेवक मनोहर म्हात्रे.

सिडको च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवी मुंबई विमानतळ अगदी सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. या वेळेस वाद चिघळला आहे तो नामकरणाचा. स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधवांची एक दिलाने अशी इच्छा आहे की या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचे नाव दिले जावे तर दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. या पार्श्‍वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली.
आपल्या भूमिकेचे विश्‍लेषण करत असताना म्हात्रे म्हणाले की सत्तरच्या दशकामध्ये जेव्हा सिडकोच्या वतीने भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, तेव्हा भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी पाटील यांनी केली आहे. हा मोबदला मिळून देण्यासाठी जो संघर्षपूर्ण लढा उभारावा लागला तो दि बा पाटील यांच्या धोरणी नेतृत्त्वात उभारला गेला.पाच शेतकऱ्यांना या लढ्यात हौतात्म्य पत्करावे लागले. अर्थातच यावेळी त्यांना जनार्दन भगत साहेब, माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची साथ होती. आज साडेबारा टक्के विकसित भूखंड परतावा योजना व त्या अनुषंगाने केलेला कायदा यामुळे स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त बांधव सुखासमाधानाचे जीवन जगत आहेत. हे सारे पाटील साहेब यांच्या मुळेच शक्य झाले. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. त्यांच्या कार्याची उंची पाहता राज्यभरातील कुठल्याही वास्तूस त्यांचे नाव देणे योग्य होईल. परंतु आपल्या विभागांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव दिले गेले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *