मान्सूनपूर्व कामांसाठी सिडकोचा कळंबोलीत सर्व्हे ; नगरसेवक सतीश पाटील यांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांनी केली पाहणी.

मान्सूनपूर्व कामांसाठी सिडकोचा कळंबोलीत सर्व्हे ; नगरसेवक सतीश पाटील यांच्या उपस्थितीत अधिकार्‍यांनी केली पाहणी
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पावसाळ्याचे दिवस काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. या कालावधीमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत होऊ नये या अनुषंगाने यंदाही सिडकोकडून नालेसफाई करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक नगरसेवक सतिश पाटील यांच्या उपस्थितीत सिडकोच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. पावसाळी नाल्या बरोबरच ड्रेनच्या गळती संदर्भातील प्रश्‍नाकडे पाटील यांनी लक्ष वेधले. याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची ग्वाही सिडकोकडून देण्यात आली.
सर्वात अगोदर वसलेल्या कळंबोली वसाहतीमध्ये अनेक समस्या आणि प्रश्‍न डोके वर काढून आहेत. विशेषता प्रभाग क्रमांक 8 मध्ये सिडकोच्या जुन्या इमारती आहेत. या ठिकाणी अल्प उत्पादन गटातील श्रमजीवी लोक राहतात. हा भाग समतल असल्याने पावसाळ्यात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होते. अनेकदा बैठ्या घरांमध्ये पाणी शिरून  त्रेधातिरपीट उडते. 25 आणि 26 जुलै 2005 ला याठिकाणी महापूर येऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. त्यानंतर सिडकोने काही प्रमाणात उपाययोजना केल्या. तरी सुद्धा कमी पावसातही या ठिकाणी पाणी साचते. या सर्व गोष्टींचा विचार करून त्याचबरोबर कोरोना वैश्‍विक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी काळामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सिडकोने खबरदारी घ्यावी अशी मागणी स्थानिक नगरसेवक सतिश पाटील यांनी कळंबोली येथील कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार कार्यकारी अभियंता बनकर आणि इतरांनी गुरुवारी प्रभाग क्रमांक आठ ची पाहणी केली. या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबणार नाही. पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही बनकर यांनी दिली.
 चौकट
मलनिस्सारण वाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती
प्रभाग क्रमांक आठमध्ये मलनिस्सारण वाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्या अनेक ठिकाणी तुंबलेले आहेत. त्यामुळे मल मिश्रित पाण्याचा निचरा न होता. हे पाणी रस्त्यावर आणि उद्यानांमध्ये वाहताना दिसत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही समस्या सुद्धा सतीश पाटील यांनी सिडको अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. याबाबतही उपाययोजना केल्या जातील असे बनकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *