तोतया पोलिसांनी चक्की चालकाला लुबाडले

तोतया पोलिसांनी चक्की चालकाला लुबाडले
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः एका तोतया पोलिसांनी चक्की चालकाला 30 हजार रुपयाला लुबाडल्याची घटना कळंबोली वसाहतीमध्ये घडली आहे.
या घटनेतील तक्रारदार बालगोपाल पाल (21) हा तरुण कळंबोली सेक्टर-3 मधील  साई कृपा फ्लोर मिल या दुकानात पिठाची चक्की चालवत असून तो त्याच ठिकाणी राहाण्यास आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन घोषीत केल्यामुळे बालगोपाल हा सकाळी 7 ते 11 या वेळेतच चक्की चालु ठेवतो. बालगोपाल हा नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता उठून आपली तयारी करत होता. त्यानंतर तो आपल्या दुकानाचे शटर अर्धवट उघडे ठेवून चक्कीच्या खराब झालेल्या दगडांच्या दुरुस्तीचे काम करत होता. यादरम्यान, सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन हेल्मेट घालुन साध्या कपडयावर आलेल्या एका तोतया पोलिसांने, बालगोपाल याला इतक्या सकाळी चक्की चालु ठेवण्याचे कारण विचारुन त्याला दरडावले.  यावर बालगोपाल याने दुरुस्तीचे काम करत असल्याचे सांगितल्यानंतर तोतया पोलिसांने त्याच्याकडे आधारकार्डची मागणी करत चक्कीमध्ये प्रवेश करुन 30 हजार रुपये दंड भरावा लागेल असे त्याला सांगितले. त्यानंतर त्याने चक्कीच्या गल्ल्यामध्ये असलेली 30 हजार रुपयांची रक्कम स्वत:कडे घेऊन बालगोपाल याला दुकान बंद करुन सोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यानंतर तोतया पोलिसाने बालगोपाल याला आपल्या मोटारसायकलवरुन कळंबोली सेक्टर-4 ई मधील शिवभोजन दुकानापर्यंत नेऊन त्याला खाली उतरवून पोलीस स्टेशनला येण्यास सांगून त्याठिकाणावरुन त्याने पलायन केले. त्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्यात गेलेल्या बालगोपालने तोतया पोलिसांची बराचवेळ वाट पाहिली, मात्र तो त्याठिकाणी न आल्याने त्याने पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्याबाबत चौकशी केल्यानंतर सदरचा पोलीस हा तोतया पोलीस असल्याचे त्याला समजले. त्यानंतर त्याने तोतया पोलिसाविरोधात तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *