शंभर हुतात्मे झाले तरी बेहत्तर विमान तळाला नाव दि बा पाटील यांचेच !कामोठे ग्रामस्थांचा एल्गार..

शंभर हुतात्मे झाले तरी बेहत्तर विमान तळाला नाव दि बा पाटील यांचेच !कामोठे ग्रामस्थांचा एल्गार

कामोठे । प्रतिनिधी ।

      नवी मुंबई विमानतळाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नुकताच सिडको अस्थापना च्या वतीने पारित करून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. ही बातमी प्रसिद्ध होताच नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचा तीव्र रोष उमटत आहे. कामोठे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने शनिवार दिनांक 8 मे रोजी पत्रकार परिषद आयोजित करून त्यात विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव द्यावे अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली. वेळ पडल्यास पराकोटीचा संघर्ष करत वाट्टेल ते मोल देण्याची तयारी ग्रामस्थांनी ठेवली असून नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद यामुळे चिघळणार यात आता दुमत नाही.
 शंभर हुतात्मे झाले तरीसुद्धा बेहत्तर परंतु नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव देण्यात यावे असा एल्गार ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आला. सन्माननीय हिंदुरुदय सम्राट यांच्याबद्दल आम्हाला आदर असला तरी सुद्धा आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या जीवनामध्ये आणि नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीमध्ये बाळासाहेबांचे कर्तुत्व आणि योगदान ते काय? असा खणखणीत सवाल ग्रामस्थांच्यावतीने उपस्थित करण्यात आला. आज आम्ही प्रकल्पग्रस्त बांधव जे काही सुखद जीवनमान अनुभवत आहोत त्याचे परिपूर्ण श्रेय हे दि बा पाटील साहेबांचे आहे. त्यांच्यासारख्या झुरणी नेतृत्वाने आम्हा प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के परताव्याचे सूत्र संपूर्ण राज्यात मान्य करून दाखविले. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा विषय येईल तेव्हा आदरणीय लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील यांच्या नावावर व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही नावाचा विचार होऊ शकत नाही अशी भूमिका ग्रामस्थ मंडळाने मांडली.

या पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांशी संवाद साधताना मंचावर जय हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोठे यांची पंच कमिटी उपस्थित होती. यामध्ये सूरदास गोवारी, के के म्हात्रे, नगरसेवक शंकर मात्रे, नगरसेवक विजय चीपळेकर, सुधाकर पाटील, सखाराम पाटील, राजेश गायकर, भालचंद्र म्हात्रे, विजय गोवारी, जाना गोवारी,रमेश म्हात्रे,सुनील गोवारी,प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट

सदर पत्रकार परिषदेमध्ये पनवेल महानगर पालिकेच्या सभागृहात प्रतिनिधित्व करणारे कामोठे मधील दोन नगरसेवक उपस्थित होते. यातील नगरसेवक विजय चिपळेकर हे सत्ताधारी पक्षाचे असून, नगरसेवक शंकर म्हात्रे हे विरोधी पक्षातील आहेत. या दोघांनीही असे जाहीर केले की विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आम्ही महानगरपालिकेच्या सभेत एकमताने मंजूर करून घेऊ.

“लोकनेते दि बा पाटील” भूमिपुत्रांची अस्मीता

कामोठे गाव आणि लोकनेते दि बा पाटील यांच्या ऋणानुबंधाची पार्श्वभूमी !

लोकनेते दि बा पाटील यांचे जन्मगाव जरी जासई असले तरी आपली कर्मभूमी हे कामोठे आहे असा उल्लेख दि बा नेहमी आपल्या भाषणात करीत असत.आणी ते तितकेचं खरे देखील आहे. कामोठे ग्रामस्थांच्या आंदोलनात दि बा नेहमी आधारस्तंभ म्हणून उभे राहीले आहेत. दि बां चे आणी कामोठे ग्रामस्थांचे ऋणानुबंध जोडले गेले त्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे.
1965 साली शासनाने कामोठे गावाची गुरचरणाची जमीन जवाहर इंडस्ट्रीज सोसायटीसाठी परस्पर संपादित केली. तेव्हा हवालदिल झालेले गावकरी दि बां कडे गेले.दि बां नी या लढ्याचे नेतृत्व केले. कामोठे गावातील सर्व महिला, पुरूष, गोठ्यातील गाई, म्हशी, बैल व बैलगाडी घेऊन पनवेल तहसीलदार कार्यालयावर विशाल मोर्चा काढला होता. त्यावेळी हा मोर्चा जिल्ह्यात प्रचंड गाजला. त्यामुळे दबावात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपादित केलेल्या जमिनी पैकी ७ एकर जमीन नोटिफिकेशन मधुन वगळून गावकऱ्यांना गुरचरणासाठी परत केली. याच जागेवर पुढे गावकऱ्यांनी शाळा उभी केली.
कामोठे ग्रामस्थांनी स्वखर्चाने बांधलेल्या या शाळेचा खर्च त्याकाळात
लोकवर्गणीतून चालविला जात असे शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे पगार सुरूवातीस गावकरी करीत होते. आज ही शाळा अनुदानित असुन रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून याविभागातील सर्वात स्वस्त आणी दर्जेदार शिक्षण येथे देण्यात येते.

गावावर या चांगल्या विचारांचे संस्कार लोकनेते दि बा पाटील यांनीच केले आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कामोठे गावच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी दि बां नी प्रयत्न केले आहेत. दि बां नी कामोठे गावाचे जणु पालकत्व घेतले होते म्हणा ना ! यातुनचं दि बा आणि कामोठे यांचे एक अतूट नाते निर्माण झाले. त्याचेच प्रतीक म्हणून, आज पनवेल मध्ये दि बां चा असणारा संग्राम बंगला हा कामोठे ग्रामस्थांनी गावातील प्रत्येक घराघरातून वर्गणी गोळा करून आणी घरटी ड्युटी लावून ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला आहे. आपल्या नेत्यासाठी असे प्रेम व्यक्त करण्याचे देशातील हे एकमेव उदाहरण आहे.

येथील शेतकऱ्यांच्या जमिनी जेव्हा सिडको करिता शासनाने 1984 साली कवडीमोल भावाने संपादित केल्या त्यावेळी दि बां नी केलेले आंदोलन हे संपूर्ण देशभरात गाजले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसीत भूखंड देण्याचे तत्व दिंबामुळे प्रस्थापित झाले.जे आज अनेक राज्यांनी स्विकारले आहे.या आंदोलनाचा गौरवशाली इतिहास आपणास सर्वश्रुत आहेचं !

या आंदोलनाचे केंद्र बिंदू जरी उरण तालुक्यातील जासई असले तरी दि बां वरील प्रचंड निष्ठा असल्याने पनवेल तालुक्यातील कामोठे गावात देखील या आंदोलनाचा उद्रेक झाला होता. तब्बल सहा महिने कामोठ्यात एस आर पी ने तळ ठोकला होता.

पुढे नवीमुंबईत साडेबारा टक्के भुखंड वाटप सुरू झाल्यानंतर सिडकोने कामोठे ग्रामस्थांना 1999 मध्ये इरादा पत्र पाठविली. इथुन कामोठ्याच्या विकासाला प्रारंभ झाला. पण यातही अनेक समस्या उभ्या राहिल्या. कामोठ्यातील संपादित जमीनींवर सिडकोने भराव टाकून सपाटीकरण केले. यावर वेगवेगळे सेक्टर व भुखंडाची आखणीही केली. या मधुन नवीन समस्या अशी आली की, शेतांचे बांध नष्ट झाल्याने येथे ईमारत बांधण्यास आलेल्या बिल्डरांना गावकरी बांधकाम साहित्य स्व:त च्या जमिनीवर कसे पुरविणार ? यावरून वाद निर्माण झाला.हा प्रश्न ग्रामस्थांनी लोकनेते दि बा पाटील यांच्याकडेही उपस्थित केला. दि बां नी गावकऱ्यांच्या एका बैठकीत झालेल्या चर्चेत गावात मजुर सोसायट्या निर्माण करून त्यामार्फत बिल्डरांना बांधकाम साहित्य पुरविण्याचे ठरविण्यात आले आणी त्याची ताबडतोब अंमलबजावणी देखील झाली.त्यामुळे गावातील वाद संपले. यानंतर या मजुर सोसायट्यांनी शेकडो कोटी रुपयांचे बांधकाम साहित्य रोटेशन पध्दतीने बिल्डरांना पुरविले.
यातुन गावात समृध्दी आली. जेथे गावोगाव या सप्लायसाठी मर्डर झाले,दंगली झाल्या आणि बळी तो कान पिळी तत्वानुसार गावात एक दोन दादा लोक दहशतीवर श्रीमंत झाले. मात्र कामोठे गावात सहकारी तत्वाने अवघा गाव श्रीमंत झाला.
या आलेल्या पैशातून गावकऱ्यांनी कोट्यावधी रूपये खर्च करून 2 शाळा, 5 मंदिरे, 2 समाज हॉल, 2 रंगमंच उभारली. गणपती उत्सव – जत्रा – दिवाळी अशा सणांना ग्रामस्थांना प्रत्येक घरटी पैसे वाटप करण्यात येवू लागले . त्याचबरोबर शाळा प्रवेशावेळीही प्रत्येक घरटी पैसे वाटप होवू लागले. कोणा गरीबाचा अंत्यविधीचा खर्च तर कोणास हाॅस्पीटल साठी मदत करण्यात येत असे. गावाच्या एकीचे हे “कामोठे माॅडेल” निर्माण झाले ते फक्त लोकनेते दि बा पाटील यांच्या आशीर्वादामुळेचं !
दि बां नेहमी कामोठे ग्रामस्थांच्या या सहकारी सोसायट्यांची महती आपल्या भाषणात द्यायचे अनेक विकसनशील गावांनी यातुन प्रेरणा घेऊन सोसायट्या स्थापन केल्या.

पुढे दि बां चा मृत्यू कामोठेवासीयांसाठी मोठा धक्का होता. दि बां च्या स्मृती अनेक प्रसंगी गावाने आजही जागृत ठेवल्या आहेत. येथे दि बां च्या नावाने कामोठ्याची एकमेव रिक्षा युनियन व टेम्पो युनीयन आहेत.
तरूण मुले दि बां च्या जयंतीस कामोठ्यातुन स्मृतीज्योत त्यांच्या जासई येथील जन्मगावी वाजत गाजत घेऊन जातात.

काय आहे कामोठे वासीयांची मागणी ?

लोकनेते दि बा पाटील यांच्या सारख्या उत्तुंगव्यक्तिमत्वाचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले गेलेचं पाहीजे ! ही कामोठे वासीयांची आग्रही मागणी आहे. कारण हा येथील भूमिपुत्रांचा अस्मितेचा प्रश्न आहे.
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी आदरणीय आहेतचं ! त्यांचे नाव राज्यातील कोणत्याही वास्तूला देता येईल.मात्र नवीमुंबईच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे लोकनेते दि बा पाटील यांच्या कर्मभूमीत उभ्या राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव द्यावे ही येथील सर्व जनतेची मागणी आहे. सिडकोने कोणालाही विश्वासात न घेता विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा चोरून केलेल्या ठरावाचा कामोठेवासीय निषेध करीत आहेत.

विमातळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी काय करणार कामोठेवासीय ?

आता कामोठेवासीय विवीध ग्रुप बनवून पनवेल,उरण व नवी मुंबई परिसरातील कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेवून जनजागृती व त्यांना संघटीत करणार आहेत. त्याच प्रमाणे पनवेल, उरण, नवी मुंबई येथील पाचही आमदारांना एकत्र आणून या मोहीमेत त्यांना सहभागी होण्याची विनंती करणार आहेत. या विभागातील महानगर पालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याचा मागणी करण्याचा ठराव करावा यासाठी प्रयत्न करणार आहेत. या विभागातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी आपले वैयक्तिक मागणी पत्र सरकारला द्यावे यासाठी प्रयत्न करणार आहेत.
या सनदशिर मार्गाने लढ्याला कितपत यश येते हे पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरवीली जाणार असून प्रसंगी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव द्यावे यासाठी उग्र आंदोलन उभारण्यास कामोठेवासीय मागे पुढे पाहणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे !
असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून नवी मुंबईतील सर्व जनतेने सोबत यावे असे आवाहन देखील केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *