कळंबोली तील कोरोना सेंटरला चांगला प्रतिसाद..

कळंबोली तील कोरोना सेंटरला चांगला प्रतिसाद
कोविड सेंटर मध्ये समुपदेशनापासून ते फिजिओथेरपीची सुविधा
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी)- पनवेल महानगर पालिका आणि वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून कळंबोलीच्या सेक्टर ५ ई मध्ये सुरु केलेल्या कोविड सेंटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेंटरमध्ये रुग्णाचे समुपदेशनापासून ते फिजिओथेरपीची सुविधा दिली जात आहे. नुकतेच रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या कोविड सेंटरला भेट देऊन समाधान व्यक्त केले.
नवी मुंबईत कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता उरण आणि नवी मुंबई परिसरात कोविड सेंटर सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानंतर पनवेल महानगर पालिकेने कळंबोली येथील सेक्टर ५ ई मध्ये ६० ऑक्सिजन बेड्स आणि १२ आयसीयू बेड्सचे सेंटर सुरु केले आहे. गेल्या दहा दिवसापासून हे सेंटर सुरु असून सध्या या सेंटरमध्ये ७० कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. पवनले महानगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, उप आयुक्त संजय शिंदे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून हे सेंटर सुरु आहे.
कोविड सेंटरला नुकतेच रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी भेट दिली. भेटी दरम्यान सुरु केलेल्या कोरोना सेंटरचा आढावा घेऊन रुग्णाशी चर्चा केली. सेंटरबाबत चौधरी यांनी समाधान व्यक्त केले. कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांची फळी दिवसरात्र रुग्णसेवेसाठी तैनात आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांना आहारतज्ञाकडून तयार करून घेतलेले मेन्यू जेवणात सकस आहार म्हणून दिले जात असल्याचे वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी सांगितले. कोरोना रुग्णांना मानसिक आधार आवश्यक असतो. त्यामुळे या सेंटर मध्ये मानसोपचार तज्ञ देखील तैनात असून ते रुग्णाशी संपर्कात असतात. एवढंच नव्हे तर रुग्णांना फिजिओ थेरेपी देण्यात येत आहे. डॉ. एस राजा हे रुग्णांना फिजिओ देण्याचे काम करत असल्याचे डॉ. घुले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *