पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी कोरोना विरुद्ध लढा देताना सतर्क रहा : नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार
पनवेल, दि. 24 (वार्ताहर): गेल्या दिड ते दोन महिन्यापासून परिमंडळ 1 व परिमंडळ 2 चे अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढा देताना 24 तास रस्त्यावर आहेत. अशा वेळी त्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यांच्या कुटुंबियांची काळजी पोलीस दलाकडून घेतली जात आहे. यासाठीच आज लोकसहभागातून त्यांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी शुक्रवारी परिमंडळ 2 आवारात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात केले.
4 हजाराच्यावर पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पोली आयुक्तालय मार्फत लोकसहभागातून करण्यात येणार आहे. त्याची औपचारिक सुरूवात आज करण्यात आली.
या कार्यक्रमास नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पोलीस उपायुक्त सुरेश मेगडे, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहा.पो.आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्यासह विविध पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून आजच्या या छोटेखानी कार्यक्रमात उपस्थित पोलीस कर्मचार्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले की, प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचार्यासाठी मास्क, सॅनिटायझर, हॅण्डग्लोज, फेस मास्क, सेफ्टी गॉगल्सचे वाटप केले आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष उपाय योजना केली जात आहे. त्यांच्याकडे लक्ष देण्यात येत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी 24 तास कर्तव्य बजावित आहे. अशा वेळी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेत आहोत.
कोणालाही आवश्यक ती वैद्यकीय मदत लागल्यास संबंधित त्यांच्या अधिकार्यांशी संपर्क साधावा. तातडीने त्यांना मदत देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी केले.