बेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…

बेकायदेशीररित्या सुरू असलेला पत्यांचा जुगार व मटका बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः पनवेल परिसरातील ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात पत्यांचा जुगार तसेच मटका सुरू असल्याने याचा त्रास परिसरातील ग्रामस्थांना होत आहे. तरी सदर अनैतिक धंदे पोलिसांनी तातडीने बंद करावेत, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल. असा इशारा विविध भागातील ग्रामस्थांनी दिला आहे.
पनवेल परिसरात असलेल्या अनेक ग्रामीण भागात त्यामध्ये प्रामुख्याने तळोजा परिसर, चिपळे, बेलवली, चिपळा, आदई, विचुंबे,पंचशील नगर नेरा आदींसह वेगवेगळ्या भागात जागा बदलून नवी मुंबईतून आलेले पत्ता व मटका किंग या ठिकाणी त्यांनी आपले बस्तान बांधण्यास सुरूवात केली आहे. सदर ठिकाणी स्थानिक लोकांपेक्षा नवी मुंबई, मुंबई व ठाणे परिसरातील खेळी मोठ्या प्रमाणात खेळण्यात येतात. दिवस-रात्र सुरू असलेल्या या जुगारात लाखोची उलाढाल होते. अनेकजण आपली दुचाकी तसेच चारचाकी वाहने घेवून येतात. त्यामुळे त्या भागात वाहतूक कोंडी नियमित होत असते. तसेच या ठिकाणी सर्रास मद्यपान केले जात असल्याने भांडणे नेहमीच होत असतात. तर दारुच्या बाटल्या बाजूच्या मैदानात किंवा रस्त्यावर टाकल्या जात असल्याने सकाळी मॉर्निंग वॉक करणार्‍यांना नेहमीच त्रास होतो. अशा प्रकारे बेकायदेशीररित्या सुरू असलेले जुगाराचे अड्डे पोलीस यंत्रणेने तात्काळ बंद करावेत, यामुळे गावातील तरुण वाईट मार्गाला लागत आहेत व यातून भांडणाचे प्रकार वाढले आहेत. तरी पोलिसांनी या नागरी समस्येकडे लक्ष घालून कडक कारवाई करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ग्रामस्थ देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *