नगरसेवक संजय भोपी यांचे निधन स्थानिक राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी…

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन
स्थानिक राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी

पनवेल (प्रतिनिधी) भाजपचे नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांची जीवनाबरोबरची लढाई अखेर संपली. भोपी गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. शेवटी बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी प्रेमा भोपी आणि मुलगा अभिषेक त्याच बरोबर इतर कुटुंबीय आहेत. त्यांच्या निधनाने खांदा वसाहतीवर शोककळा पसरली. त्याचबरोबर भाजपमध्ये आणि स्थानिक पातळीवरील राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या संजय भोपी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात संघर्ष केला. रियल इस्टेटमध्ये त्यांनी जम बसवला. युवा उद्योजक म्हणून ते पुढे आले. पनवेल नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी पदार्पण केले पण त्यांना अपयश आले त्यानंतर संजय भोपी यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांना प्रभाग १५ मध्ये पक्षाने उमेदवारी सुद्धा दिली. आणि ते निवडून सुद्धा आले. अत्यंत कमी कालावधी मध्येच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या गुड बुकात भोपी यांनी जागा मिळवली होती. लागलीच त्यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर प्रभाग समिती ब चे सभापतिपद सुद्धा त्यांना देण्यात आले. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते प्रभाग समिती सभापती असा त्यांचा प्रवास राहिला. संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सिटीझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुप या संस्थांमध्ये ते सक्रिय होते. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी ते कायम धावून जात असत. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत तत्पर असलेले कार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. खांदा वसाहतीतील प्रश्न आणि समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ते कायम पाठपुरावा करत असत. मितभाषीक, संवेदनशील, प्रेमळ आणि मनमिळावू असे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. दांडगा जनसंपर्क, मोठा मित्रपरिवार त्यांच्याकडे होता. अज्ञात शत्रू म्हणून त्यांची पनवेलच्या राजकारणामध्ये ओळख होती. दरम्यान कोरोनाच्या काळात त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी मधून प्रभावी काम केले. गोरगरीब गरजूंना मदतीचा हात दिला. हे करत असताना त्यांना कोरोनाविषाणूचा संसर्ग झाला. संजय भोपी यांना उपचारासाठी अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्रकृती सुद्धा सुधारणा झाली. परंतु त्यानंतर पुन्हा प्रकृती खालावली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वतः लक्ष घालून त्यांना उपचारासाठी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आपल्या जीवनाबरोबर लढाई सुरु होती. अखेर बुधवारी या लढवय्या लोकप्रतिनिधी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.

कोट-
लोक कल्याणाचा मार्ग आपल्या तेजाने तेजांकीत करणारा एक तारा तिरोहित झाला..
पनवेलच्या राजकारणातील न भरून निघणारी क्षती..
आज सकाळी माझे सहकारी मित्र तसेच पनवेल महानगरपालिकेचे मा. ‘ ब’ प्रभाग समिती सभापती आणि नगरसेवक संजय दिनकर भोपी यांच्या निधनाची बातमी समजातच खुप दु:ख झाले. समाजासाठी दिवस रात्र मेहनत करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी कार्यरत रहाणारे, कुठलीही जवाबदारी स्वतःचे काम समजून ती यशस्वी करण्यासाठी धड़पडणारे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे, प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देणारे, सर्व वयोगटात मिसळून काम करणारे नेतृत्व म्हणजेच संजय भोपी सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंबीय, आप्त परिवार आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी मी प्रार्थना करतो. – आमदार प्रशांत ठाकूर

संजय भोपी तळमळीने काम करणारा लोकप्रतिनिधी – लोकनेते रामशेठ ठाकूर

महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक संजय भोपी यांनी नेहमीच राजकारण विरहित काम केले आहे. सामाजिक कार्यातही त्यांचे काम उदंड होते. एक सामान्य कार्यकर्ता ते उत्कृष्ट लोकप्रतिनिधी, समाजसेवक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतःची चांगली प्रतिमा समाजात निर्माण केली. दांडगा जनसंपर्क, मोठा मित्रपरिवार, मितभाषी, संवेदनशील, प्रेमळ आणि मनमिळावू असे त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. नगरसेवक संजय भोपी यांच्या निधनाने एक चांगला लोकप्रतिनिधी आणि सहकारी आम्ही गमावला आहे. – लोकनेते रामशेठ ठाकूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *