ऊदानी फाउंडेशन कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल दि.23 (वार्ताहर)- कोविड 19 या संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये याकरिता शासनाने लाॅकडावून जाहीर केले आहे. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त अनेक उद्योगधंदे, कामकाज ठप्प झाले आहे यातच हातावर पोट असलेले कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर, कंत्राटी कामगार, छोटे-मोठे व्यवसायिक यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक जणांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली आहे.
नवी मुंबईतील यु.एस.आर. ग्रुपचे व ऊदानी फाउंडेशन यांच्या वतीने पनवेल तालुक्यातील एक हजार शंभर गरीब, गरजू कष्टकरी कामगार, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहिती उदानी फाउंडेशनच्या अध्यक्षा नेहा उदानी यांनी दिली आहे. पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत साडेसातशे जीवनावश्यक वस्तूंचे कीट तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
लाॅकडाऊन मुळे अनेक जणांची उपासमार होत आहे. शासनाने लाॅकडाऊन घोषित केल्यापासून ऊदानी फाउंडेशन, कॉन्शियस सिटीझन फोरम, दत्त मंदिर नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळ, सीबीडी येथे कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले असून सुमारे 6000 जेवणाचे पॅकेट्स रोज या कीचनमधून नवी मुंबई मधील वाटसरूंना गोरगरिबांना रोज मोफत जेवण पूर्वीत आहेत. याव्यतिरिक्तही पनवेल तालुक्यातील अनेक गरजू गरीब कष्टकरी कामगार यांच्या हातचे काम गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने पनवेल तालुक्यातील कोपर, कुंडेवहाळ, मानघर करंजाडे, पेंदर, पैठाली, पापडीचा पाडा, ओवे गाव मुकरीची वाडी अशा गावांमध्ये ऊदानी फाउंडेशन व यू.एस आर. ग्रुप नवी मुंबईच्या वतीने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, ऊदानी फाऊंडेशनच्या अध्यक्षा नेहा उदानी व युएसआर ग्रुप यांनी सामाजिक बांधिलकी जपत हजारो कुटुंबांना आधार देत आहेत. गेले अनेक वर्षे सामाजिक उपक्रम ते नवी मुंबई रायगड सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राबवीत आहेत त्यांच्या या कार्याला अनेक गोरगरीब जनता आशीर्वाद देत आहे.