कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या रिकव्हरी एजंटला कर्जदार व त्याच्या मुलाने केली बॅट व रॉडने मारहाण..

कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या रिकव्हरी एजंटला कर्जदार व त्याच्या मुलाने केली बॅट व रॉडने मारहाण; दोघांना अटक
पनवेल दि.28 (वार्ताहर): खांदा कॉलनीतील एका कर्जदाराच्या घरी होम लोनच्या रिकव्हरीसाठी गेलेल्या प्रसाद दिनकर भोसले (43) या रिकव्हरी एंंजटला कर्जदाराने व त्याच्या मुलाने बॅट व रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकिस आली आहे. या मारहाणीमुळे अत्यवस्थ झालेले भोसले मागील दिड महिन्यापासून रुग्णालयात अंथरुणाला खिळून पडले असून अद्याप त्यांच्या प्रकृतीत कुठल्याच प्रकारची सुधारणा झालेली नाही. कर्जदार शामलकुमार हिरा व त्याचा मुलगा सौरभ हिरा (18) या दोघांनी केलेल्या मारहाणीमुळे भोसले यांची ही अवस्था झाल्याने खांदेश्वर पोलिसांनी मारहाण करणारा कर्जदार व त्याच्या मुलावर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
          या प्रकरणात जखमी झालेले प्रसाद भोसले हे चेंबुर येथे राहाण्यास असून ते वडाळा येथील साईस फायनान्स मध्ये रिकव्हरी एजंट म्हणून कामाला आहेत. गत 1 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ते खांदा कॉलनी सेक्टर-1 मधील कर्जदार शामलकुमार हिरा याच्या घरी कर्जाच्या वसुलीसाठी गेले होते. यावेळी शामलकुमार हा घरामध्ये जेवत असल्याने प्रसाद भोसले हे त्यांच्या घराच्या बाहेर उभे राहिले. याच गोष्टीचा शामलकुमार याला राग आल्याने त्याने जेवण अर्धवट सोडून घरातील बॅट वसुलीसाठी आलेल्या भोसले यांच्यावर उगारली. त्यामुळे भोसले बॅटचा फटका वाचविण्यात पाय घासरून खाली पडले. मात्र त्यानंतर देखील शामलकुमार याने त्यांच्या डोक्यात बॅटने तर त्याच्या मुलाने रॉडने मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या भोसले यांनी आपल्या मोबाईलवरून फोन करण्याचा प्रयत्न केला असता, शामलकुमार याने त्यांच्या हातातून मोबाईल खेचुन घेत त्याच्यावर बॅट मारुन त्याचे नुकसान केले. त्यानंतर भोसले बेशुद्ध झाल्याने काही नागरिकांनी त्यांना खांदा कॉलनी येथील अष्टविनायक हॉस्पीटलमध्ये दाखल केले. दुस़र्‍या दिवशी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना केईएम हॉस्पीटलमध्ये दाखल केले. तेथे 6 दिवसानंतर प्रसाद भोसले शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या पत्नीला दिली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भोसले आपल्या मुळे गावी सातारा येथे कुटुंबासह गेले होते. मात्र त्याठिकाणी त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्यानंतर भोसले यांना कराड येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात 20 दिवस उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्याने अखेर त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पीटलमध्ये हलण्यात आले आहे. प्रसाद भोसले यांच्या डोक्यात मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाल्याने सद्या त्यांचे फक्त डोळे उघडे असून त्यांच्या शरीराचा कोणताही अवयव प्रतिसाद देत नसल्याचे त्यांच्या पत्नी रुपाली भोसले यांनी सांगितले. भोसले यांची काहीच चुक नसताना त्यांना बॅट आणि रॉडने बेदम मारहाण केली गेल्यामुळे ते मागील दिड महिन्यापासून अंथरुणाला खिळुन पडल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे भोसले यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. तसेच त्यांच्यावर आता कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. प्रसाद भोसले यांची अशी अवस्था कर्जदार शामलकुमार व त्याच्या मुलाने बॅट आणि रॉडने मारहाण केल्यामुळेच झाल्याने भोसले यांच्या पत्नीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार  दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी शामलकुमार हिरा व त्याचा मुलगा सौरभ हिरा या दोघांविरोधात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *