पत्रकार आणि पोलीस बांधव यांची विनामूल्य कोविड चाचणी करण्याची नगरसेवक रवींद्र भगत यांची मागणी
पनवेल, दि.20 (वार्ताहर): कोविंड 19 चे थैमान आटोक्यात आणण्यामध्ये प्रशासनाला हळूहळू यश येत आहे. असे असले तरी पॉझिटिव चाचण्या समोर येतच आहेत. करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या पॅटर्नचा विचार केला असता घराबाहेर असणार्यांना याची लागण होण्याची शक्यता जास्त असते. या पार्श्वभूमीवर जनसेवेसाठी बाहेर असणारे पोलीस बांधव आणि पत्रकार यांची विनामूल्य करोना चाचणी करण्यात यावी अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच त्यांना पीपीई किट आणि जीवनावश्यक वस्तू देखील पुरविण्यात याव्यात अशी त्यांनी मागणी केली आहे.
नगरसेवक रवींद्र भगत यांनी याबाबत सांगितले की नुकतेच प्रशासनाच्यावतीने नवी मुंबई मधील पत्रकार बांधवांच्या साठी विनामूल्य करोना चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल मधील पत्रकार व पोलीस बांधव हे आपली कर्तव्य बजावत असताना सातत्याने घराबाहेर असतात. त्यामुळे विषाणू संसर्ग होण्याची शक्यता त्यांच्याबाबतीत जास्त असते. त्यामुळे पत्रकार व पोलीस बांधव यांची विनामूल्य करोना विषाणू चाचणी करण्यात यावी आणि त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात याव्या अशी प्रशासनाकडे मागणी केली आहे.