अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेची ठोस कारवाई..

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिकेची ठोस कारवाई
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः तळोजा वसाहत मधील पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय करणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करुन पनवेल महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपथ मोकळे केले आहेत.
तळोजा मधील पाचनंद हाईट्स, कर्नाळा बँक आणि तळोजा पोलीस चौकी समोरील चौकात बेकायदा फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय थाटल्याने नागरिकांना पदपथ आणि रस्त्यावरुन चालता येत नव्हते. ‘कोरोना’मुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये पनवेल महापालिका अधिकार्‍यांना तळोजा मधील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करता आली नाही. त्यामुळे रस्ते आणि पदपथावर व्यवसाय करणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. अखेर महापालिका अधिकार्‍यांनी तळोजा मधील पाचनंद हाईट्स, कर्नाळा बँक आणि तळोजा पोलीस चौकी समोरील चौकात बेकायदा व्यवसाय करणार्‍या फेरीवाल्यांवर अचानक धडक कारवाई करुन फेरीवाले व्यवसायासाठी वापरत असलेल्या हातगाड्या तसेच बांबू आणि इतर साहित्य जप्त केले. महापालिकेने अचानक कारवाई केल्यामुळे अनेक बेकायदा फेरीवाल्यांनी हातगाडी घेवून पळ काढला.
कोट
तळोजा मध्ये बेकायदा फेरीवाल्यांनी व्यापलेले पदपथ मोकळे करुन 7 हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पदपथ अडवून पक्के बांधकाम केलेल्या दुकान व्यावसायिकांना नोटीस देवून बांधकाम हटविण्यास सांगितले आहे. दुकान व्यावसायिकांनी पदपथावर केलेले बांधकाम स्वतःहून न हटविल्यास ते हटविण्याची कारवाई पनवेल महापालिका द्वारे करण्यात येणार आहे. – दशरथ भंडारी, अ प्रभाग अधिकारी – पनवेल महापालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *