पळस्पे येथील वाहतूक कोंडीची समस्या निवारण करण्याची नागरिकांची मागणी…

पळस्पे येथील वाहतूक कोंडीची समस्या निवारण करण्याची नागरिकांची मागणी…
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः पनवेल जवळील पळस्पे फाटा येथे दररोज मोठ्या प्रमाणात पनवेल बाजूकडून पुणे बाजूकडे जाणार्‍या रस्त्यावर पेट्रोल पंप परिसरात वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विना परवाना हातगाड्या व खाद्यपदार्थाच्या गाड्या लावण्यात येत असल्याने होते. तरी पनवेल वाहतूक शाखेने संबंधित गाड्यांवर कारवाई करून रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पनवेलसह नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली व परिसरातील नागरिक पुणे बाजू व कोकणात जातात. यावेळी ते चार चाकी वाहने घेवून जातात. पळस्पे फाटा येथे असलेले बिअरबार, वाईन शॉप, तसेच रस्त्यावर मिळणारी खाद्यपदार्थ व इतर दुकाने यांच्या खरेदीसाठी हे वाहन चालक रस्त्यावरच आपली वाहने उभी करून खरेदीसाठी बाहेर पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. काही अंतरावर महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे सुद्धा रस्ता छोटा करण्यात आला आहे. त्यातच ही वाहतूक कोंडी असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या संदर्भात संबंधित वाहतूक शाखेकडे वेळोवेळी तक्रार करून सुद्धा कारवाई का होत नाही, असा सवाल या भागातील रहिवाशी करीत असून येथे राहणार्‍या रहिवाशांना या वाहतूक कोंडीचा नियमित त्रास होत असतो. तरी वाहतूक शाखेने या ठिकाणी वाहतूक पोलीस उभे करून तसेच रस्त्यावर विना परवाना वाहने उभी करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशी करीत आहेत.
फोटो ः वाहतूक कोंडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *