कम्युनिटी आरोग्य केंद्राच्या वतीने गरिब व गरजू कुटुंबीयांच्या आरोग्याची मोफत तपासणी

पनवेल, दि.18 (वार्ताहर)- करोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब, गरजू कुटुंबीयांच्या त्रासात भर पडली आहे. अशा गरजू नागरिकांना आधार देण्यासाठी कोपरखैरणे येथील ओम गगनगिरी रुग्णालय आणि अॅक्युपेशनल सेंटर तसेच प्रभात ट्रस्टच्या वतीने नवी मुंबईतील दुसरे कम्युनिटी आरोग्य केंद्र कोपरखैरणे येथील ज्ञानविकास शिक्षण संस्थेच्या प्रांगणात सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या वतीने एक्स रे व रक्ततपासणी सुविधा पूर्णपणे मोफत दिली जात आहे.

ओम गगनगिरी रुग्णालयाचे विरेंद्र म्हात्रे यांच्या संकल्पनेतून बेस्ट बसच्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या चालक आणि वाहकांसाठी सलग चार दिवस मोफत सुविधा देण्यात आली. या चार दिवसांत बेस्ट बसचालकांसह २०० नागरिकांनी या हेल्थ सेंटरचा लाभ घेतला. यासाठी फार्मा असोसिएशनच्या वतीने औषधे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तसेच कोपरखैरणे येथील लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई यांच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नवी मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य मिळत आहे अशी माहिती आयोजक विरेंद्र म्हात्रे आणि सोमनाथ बारवे यांनी दिली. समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभागी होऊन यासाठी औषधे, मास्क, सॅनिटायझर, साबण, जीवनावश्यक वस्तू किंवा डिजिटल पद्धतीने देणगी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई कडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *