पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा पोलिस प्रशासनाला आर्त सवाल..

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती चा खणखणीत इशारा

कोरोनाने ज्या गोरख धंद्यांना बंद केलेत अशांना पुन्हा सुरु करण्याचा तुमचा अट्टाहास कशासाठी ?

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा पोलिस प्रशासनाला आर्त सवाल

पनवेल/प्रतिनिधी
कोविड १९ विषाणूमुळे सारे विश्व थांबले! देशाच्या अर्थचक्राला लॉक डाऊन मुळे खीळ बसली. मिशन बिगिन अंतर्गत पुन्हा जिवनावश्यक धंदे हळू हळू सुरु होत आहेत. कित्येक व्यवसाय अद्यापही शासकीय अनुमतीच्या प्रतिक्षेत आहेत.याच विषाणूची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे, परंतु अशा दोलायमान परिस्थितीत सुद्धा लेडीज बार सारख्या समाजाला कीड लागलेल्या गोरख धंद्यांना पुन्हा ऊत आणण्यासाठी काही अतृप्त जीव कामास लागल्याचे खात्रीलायक सूत्रांच्या कडून समजल्यावर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने या धंद्यांना अटकाव घालण्याचा चंग बांधला आहे.
वास्तविक पाहता स्वर्गीय आर आर पाटील यांच्या समोर माजी आमदार विवेक पाटील यांनी लेडीज बार बंदीच्या बाबत तारांकित प्रश्न उपस्थित केल्यावर मध्यरात्रीपर्यंत उहापोह केल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील अर्थात आबा यांनी महाराष्ट्रात लेडीज बार बंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. परंतु त्या नंतर न्यायालयीन प्रश्न उपस्थित करत भलत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा गोरख धंदा पुन्हा समाज स्वास्थ्य बिघडवू लागला होता. कोरोना कालखंडात हा धंदा बंद झाल्यानंतर अशा समाजविघातक धंद्यांना कायमची मूठमाती देण्याऐवजी पोलीस प्रशासन मात्र त्यांना पुन्हा नवी उभारी देण्याच्या प्रयत्नात असल्याचे खात्रीलायक सूत्रांच्या कडून समजते.
पनवेल हि ऐतिसासिक नगरी म्हणून प्रसुद्ध आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज,संविधानकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,थोरले बाजीराव,चिमाजी अप्पा,प्रबोधनकार ठाकरे अशा थोरा मोठ्यांच्या पावनस्पर्शाने हि भूमी महाराष्ट्राच्या इतिहासात सोनेरी आठवणी जागवते. बैलगाड्यांच्या चाकांचे कारखाने,तांदुळाची कोठारे,पिण्याच्या पाण्यांचे बारमाही तलाव,धूतपापेश्वर कारखाना,मुंबईचे प्रवेशद्वार अशा ठळक गोष्टींच्या साठी प्रसिद्ध असणारे पनवेल नव्वदीच्या दशकात आलेल्या लेडीज बार मुळे मात्र पार बदनाम झाले. लाखो संसार उध्वस्त झाले. पनवेल तालुका,रायगड जिल्हा या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र,खान्देश,मराठवाडा येथील सधन दौलतजादा करण्यासाठी पनवेल नगरीत येऊ लागले. इतकेच काय तर कर्नाटक गुजराथ अशी परराज्यातील आंबट शौकीन त्यांची हवस मिटवण्यासाठी पनवेल चे मार्ग धुंडाळू लागले. ऐतिहासिक वसा जपणारे पनवेल काही वर्षातच वेश्यालय म्हणून नावारूपास आले. लॉक डाऊन पूर्वी सुद्धा पनवेलकर हाच काळा डाग कपाळावर घेऊन जगत होते. उत्तर रात्री अशा लेडीज बार च्या समोरून प्रवास करणे माता भगिनींना असुरक्षित वाटू लागले होते. लॉक डाऊन मध्ये सारे जग थांबले असताना हि अवदसा सुद्धा बंद झाल्याने महिला वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात होते. परंतु हा दुष्टचक्राचा फेरा पुन्हा सुरु करण्यासाठी काही नराधम सरसावले आहेत.अशाच नराधमांना विरोध करण्यासाठी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने चंग बांधला असल्याचे समितीचे सरचिटणीस रवींद्र गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
सोमवार चा सूर्य मावळल्यावर पुन्हा या लेडीज बार नामक संसार उध्वस्त करणाऱ्या कारखान्यात डी जे चे सूर दणाणणार आहेत,त्यावर बारबालांची पाऊले थिरकतील. मुंबई,नवी मुंबई मधून गाड्याच्या गाड्या भरून बार बाला येथे आणल्या जातील, त्यांना नाचवले जाईल,त्यांना नागवले जाईल, अमीरजाद्यांच्या औलादी त्यांच्यावर पैसे उडवतील,त्यासाठी तरुणींना या वेश्या व्यवसायात ढकलले जाईल. कित्येक व्यावसायिकांना देशीधाडीला लावले जाईल. परंतु असे काही आम्ही होऊ देणार नाही! अशी खणखर भूमिका पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने घेतली आहे, त्यांच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार जनमताचा आदर न करता जर लेडीज बार सुरु करण्यात आले तर येणाऱ्या आंबट शौकीन गिऱ्हाईकांचे आम्ही गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करू तसेच पत्रके देऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न देखील करू असे सांगण्यात आले. त्यामुळे लेडीज बार सुरु करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नात पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती चा आडवा दांडा असणार हे मात्र निश्चित!

चौकट-१

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ २ च्या वतीने नुकतंच “नशामुक्त नवी मुंबई अभियान” लॉन्च करण्यात आले. परंतु हे अभियान केवळ कागदावरच न राहता लेडीज बार बंदी हे सुद्धा उद्दिष्ट या अभियानात घेतले पाहिजे ! अशी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची भूमिका आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अमली पदार्थ,दारू,गुटखा यांच्या इतकीच “बाईची नशा” सुद्धा संसार उध्वस्त करते. त्यामुळे या अभियानाअंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी लेडीज बार बंदीच्या भूमिकेवर आमची पाठराखण केली पाहिजे अशी समितीची मागणी आहे.

चौकट-२

पोलिस दलातील कित्येक अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर हे कबूल केले आहे कि, लेडीज बार सुरु असल्यास कायदा व सुव्यस्थेस बाधा पोहोचते. गुन्ह्यांचा आलेख वाढत असतो. चोऱ्यांचे प्रमाण वाढते. तरुण वर्ग या नशेसाठी काहीही करण्यास मागे पुढे धजावत नाही. जर लेडीज बार समाज स्वस्थ बिघडवण्यास इतके कारणीभूत असती तर असले धंदे सुरु करण्याचा प्रयत्न का व कुणासाठी होत आहे? असा आर्त सवाल पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने उपस्थित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *