कळंबोली, कामोठे येथील मराठा आंदोलन विषयक गंभीर गुन्हे मागे घ्या…

कळंबोली, कामोठे येथील मराठा आंदोलन विषयक गंभीर गुन्हे मागे घ्या.. ; खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांना रामदास शेवाळे यांचे साकडे
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः  मराठा क्रांती मोर्चाचा आंदोलनामध्ये अनेकांवर शासनाने गंभीर गुन्हे दाखल केले आहे. त्यामध्ये डॉक्टर, इंजिनीयर, बँकर्स, वकील यांचा समावेश आहे. हे अन्यायकारक गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी रायगड सकल मराठा समाजाच्या वतीने सातत्याने करण्यात आली आहे. दरम्यान बुधवारी शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी खासदार संभाजीराजे भोसले यांची मुंबई भेट घेतली. त्यांनी कळंबोली आणि कामोठे येथील मराठा क्रांती मोर्चातील सदस्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी पाठपुरावा व्हावा असे साकडे घातले. याबाबत आपला पाठपुरावा सुरू असून नक्कीच यश मिळेल असा विश्‍वास खा. भोसले यांनी व्यक्त केला.
जगाने दखल घ्यावी असे लाखोंचे मुक मोर्चे सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आले. तेही शांततेच्या मार्गाने आणि कमालीचा संयम ठेवून. तरी देखील मराठा आरक्षणाबाबत निर्णायक पाऊले उचलण्यात आले नाहीत. मराठा बांधवांनी आत्महत्येचे सत्र चालु  केले असतानाही तत्कालीन सरकार निमुटपढे डोळे मिटुन बघत राहिले . यातुनच समाजाच्या मनात खदखद वाढु लागली असल्याचे सकल मराठा समाजाचे म्हणणे आहे . या सर्व घटनांचा परिणाम म्हणुन सकल मराठा समाजाने महाराष्ट्र आणि मुंबई बंदची 25 जुलै 2018 हाक दिली. मुकमोर्चा प्रमाणेच मराठा समाजाचा बंद शांततेत चालु असताना गर्दीचा गैरफायदा घेऊन समाजकंटकांनी शांततेत चालु असलेल्या बंदला हिंसक वळण दिलं. आणि त्यातुन झालेल्या उद्रेकात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालं . विशेष करून कळंबोली आणि कामोठे परिसरात वातावरण चिघळले. राज्य शासनाने त्यावेळी मराठा समाजातील व्यक्तींवर सराईत गुन्हेगारांप्रमाणे 307, 353, 145, 147, 153 इ सारखी गंभीर कलमे टाकुन गुन्हे दाखल केले. विशेष कामोठे आणि कळंबोलीतील अनेक जण हिंसक आंदोलनांमध्ये नव्हते. कित्येकांनी कामावर असल्याचे पुरावे सादर केले. तरीसुद्धा त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कित्येक जणांचे करियर या गुन्ह्यांमुळे सुरू होण्याच्या अगोदरच संपण्याच्या मार्गावर आहे.  यासंदर्भात रायगड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. दम्यान बुधवारी सकल मराठा समाजाचे स्थानिक नेतृत्व तथा शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी मुंबई येथे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भेट घेतली. कळंबोली कामोठे येथील मराठा समाजातील अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आंदोलनाच्या हिंसक वळणात त्यांचा काडीमात्र संबंध नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर न्यायालयात आरोप पत्र सादर करण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित मराठा समाजातील व्यक्तींवर हा अन्याय असून यासंदर्भात सकल मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून आपण कळंबोली कामोठे येथील समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेवाळे यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याकडे केली. याबाबत आपला पाठपुरावा सुरू असून याविषयी सरकार नक्कीच सकारात्मक विचार करेल असा विश्‍वास खा. भोसले यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *