कळंबोली वसाहतीत एकापाठोपाठ एक केले जात आहेत वृक्षांवर विषप्रयोग…

कळंबोली वसाहतीत एकापाठोपाठ एक केले जात आहेत वृक्षांवर विषप्रयोग;कळंबोली विकास समिती नागरिकांसह शासकीय यंत्रणेचे अनोख्या पद्धतीने लक्ष वेधणार पनवेल.. दि.29 (वार्ताहर)- कळंबोली वसाहतीत पनवेल ते सायन महामार्गालगत जाहिरातीचे होर्डिंग दिसण्यास अडथळा येत असल्याने चक्क झाडांवर विषप्रयोग केला जात आहे. एका पाठीमागून एक वृक्ष संपवण्याचे कारस्थान सुरूच आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासकीय यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. शेवटी आमच्यासाठी नव्हे किमान तुमच्यासाठी तरी आम्हाला वाचवा अशा प्रकारे झाडांचा अर्त टाहु कळंबोली विकास समिती अनोख्या पद्धतीने प्रशासन आणि नागरिकांसमोर मांडणार आहे.         पनवेल सायन महामार्गालगत शिवसेना शाखेसमोर पूर्वी इमारतीच्या कंपाऊंडमध्ये तसेच बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती. या झाडांमुळे या परिसरात एक प्रकारे हिरवाई दिसून येत यामुळे आजूबाजूच्या इमारतींना एक प्रकारे ऑक्सीजन मिळत होता. सिमेंटच्या जंगलातही अशा प्रकारे झाडे असल्याने पर्यावरण संतुलनासाठी काही प्रमाणात मदत होत होती. परंतु वर्षभरापूर्वी याठिकाणी एका खाजगी जाहिरात कंपनीने मोठे होर्डिंग उभे केले. इमारतींच्या कंपाऊंडमध्ये लोखंडी पिलर टाकण्यात आले. वास्तविक पाहता वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या  परिसरात अशाप्रकारे होर्डिग्ज उभे करणे धोकादायक आहे. असे असतानाही पनवेल महानगरपालिकेकडून याला परवानगी देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे याकरीता आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग करण्यात आला. अचानक हिरवीगार असलेली झाडे सुकुन गेले धोकादायक म्हणून महापालिकेने त्यावर कुर्‍हाड मारली आणि गेल्या काही वर्षांपासून असलेली या ठिकाणची वनसंपदा नाहीशी झाली. यासंदर्भात कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी आवाज उठवला. महापालिकेच्या महासभेत सुद्धा प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. परंतु यावर विषप्रयोग झालाच नाही अशा प्रकारे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर शाखे समोरील काही झाडांवर अशाच प्रकारे रसायन टाकून सुकवण्यात आले. काही दिवसांपूर्वी मॅकडोनाल्ड समोरील काही झाडे रात्रीतून तोडण्यात आली याबाबतही कळंबोली विकास समितीने संबंधितांकडे तक्रार केली. हे प्रकरण ताजे असताना शिवसेना शाखेपासून काही मीटर अंतरावर एका मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या खोडाला बिळे पाडून त्यामध्ये घातक रसायन टाकण्यात आले. परिणामी हे झाड वाळले. यासंदर्भात प्रशांत रणवरे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि महापालिकेला लेखी तक्रार केली होती. अशाप्रकारे झाडांवर राजरोसपणे विषप्रयोग करून ते नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून कट आखला जात आहे. दोन दिवसापूर्वी आणखी एका झाडाच्या खोडांना इजा पोचून त्याठिकाणी रसायन भरले आहे. येथे नवीन  एक जाहिरातीचे होर्डिंग्ज उभारण्यात येणार असल्याने अशाप्रकारे विषप्रयोग केला गेला असल्याचे बोलले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे कळंबोली विकास समितीच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *