288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पनवेल महापालिकेत समावेशन; आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मनपा सत्ताधार्‍यांचे कर्मचार्‍यांनी मानले आभार पनवेल…

288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पनवेल महापालिकेत समावेशन; आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मनपा सत्ताधार्‍यांचे कर्मचार्‍यांनी मानले आभार पनवेल : वार्ताहर
पनवेल महापालिकेत काम करणार्‍या पूर्वाश्रमीच्या 288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे महापालिकेच्या सेवेत समावेशन करण्यात आले आहे.
या संदर्भातील मंजुरीचा जीआर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडून काढण्यात आला आहे. यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता.
पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत करण्यात आला. या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी महापालिकेत समावेश व्हावा अशी मागणी सातत्याने लावून धरली होती, मात्र जिल्हा परिषदेकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यानेे समावेशन प्रकियेला लांबली. यासाठी नगरविकास विभागाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. कोकण आयुक्तांनी नगरविकास विभागाला याबाबत 25 जानेवारी 2019 रोजी अहवाल दिला. हा अहवाल सादर करूनही नव्या सरकारकडून निर्णय प्रलंबित असल्याने कर्मचार्‍यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी आंदोलनेही केली. अखेर 288 कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यास नगरविकास खात्याने सोमवारी (दि. 23) मंजुरी दिली. त्यामुळे या कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
समावेशन झालेल्या कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधींनी आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांना पेढे भरवून धन्यवाद दिले. आपल्या सहकार्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची नम्र भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. नगरसेवक नितीन पाटील, म्युन्सिपल एम्प्लॉइज युनियनचे अ‍ॅड. सुरेश ठाकूर व सहकारी उपस्थित होते.
लढ्याला यश आले : आमदार प्रशांत ठाकूर
या संदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 स्थापना झाली, तेव्हापासून महापालिकेच्या सेवेत असणार्‍या ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांच्या दृष्टिकोनातून आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. या कर्मचार्‍यांचा अ‍ॅड. सुरेश ठाकूर व सहकार्‍यांसह प्रशासन, राज्य शासनाशी समावेशनासाठी लढा सुरू होता. या संघर्षाला यश आले आहे. या संदर्भात आपल्या सोबतीने मलाही वेगवेगळ्या पद्धतीने पाठपुरावा करता आला. या सार्‍याचे फळ आज मिळतंय. 288च्या पुढचे जे कर्मचारी राहिले आहेत त्यांनाही सामावून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात आणि येणार्‍या काळात ही प्रक्रियासुद्धा पूर्ण होईल याची मला खात्री आहे. महत्त्वाच्या टप्प्यावर यश आल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *