पनवेल शहर पोलिसांनी केली गावठी हातभट्टी उध्वस्त; तीन जणांना घेतले ताब्यात

पनवेल, दि.17 (वार्ताहर)- कोरोना विषाणूचा संसर्ग, प्रादूर्भाव रोखण्यासाठी पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे विशेष उपाययोजना करीत असून त्या अंतर्गत पनवेल शहर परिसरात अवैधरित्या विक्री होणारी देशीविदेशी मद्यसाठा हस्तगत केला आहे. त्याप्रमाणे आज त्यांनी पनवेल ते पेणकडे जाणाऱ्या रेल्वे पटरीच्या कडेला उसर्ली गावाजवळ छापा टाकून त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या गावठी हाभट्टी दारू गाळताना ती उध्वस्त केली आहे व याप्रकरणी तीघांना ताब्यात घेतले आहे.

उसर्ली गावाजवळ बेकायदेशीररित्या गावठी हाभट्टी दारू गाळण्याचे काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विश्वासराव बाबर, पो.ना. किरण सोनवणे व पो.ना. नंदकुमार माने यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून 28 हजार 150 रूपये किंमतीचे दारू बनविण्याचे एकूण 810 लिटर एकूण कच्चे रसायन, प्लॅस्टिक ड्रम, पत्र्याचे डबे, गावठी दारू, दोन स्टेव्ह व इतर भांडी असा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे व या प्रकरणी भरत म्हात्रे (वय-40) भगवान जमादार (वय-42) व डान्सर छोटू राठोड या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या 25 दिवसात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरात 6 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून 23 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे व त्यांच्याकडून 1, 55, 949/- रूपयांचा विदेशी मद्य व गावठी हातभट्टी दारू तसेच 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

कोटः- व्यसनाधिन व्यक्तींना लॉकाडाऊनच्या कालावधीचा सदोपयोग करून दारू, तंबाखू, गुटखा यापासून व्यसनमुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

– वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *