महिला स्वच्छता दुतांच्या कर्तव्याचा सन्मान…

महिला स्वच्छता दुतांच्या कर्तव्याचा सन्मान
कामोठेत साडी चोळी देऊन भरली ओटी

एकता सामाजिक संस्थेचा नवरात्रोत्सवानिमित्त उपक्रम
पनवेल /प्रतिनिधी:- कोरोना वैश्विक संकटात वैद्यकीय क्षेत्रात तसेच पोलीस दलात काम करणाऱ्या महिला आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेतच . त्यांच्याप्रमाणे या कठीण काळात परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अखंडपणे सेवा देण्याचे काम स्वच्छता विषयक महिला कर्मचारी सुद्धा करीत आहेत. त्यांचे कर्तव्य आणि कार्याची कामोठे येथील एकता सामाजिक संस्थेने शनिवारी सन्मान केला. पनवेल मनपाच्या महिला स्वच्छता दुतांना साडी चोळी देवून त्यांची ओटी भरण्यात आली. या अनोख्या उपक्रमाने समाजासमोर खऱ्या अर्थाने एक वस्तू पाठ ठेवण्यात आला आहे.

कोरोना या आजाराने अक्षरश थैमान घातले आहे. संक्रमण होऊ नये म्हणून टाळेबंदी करण्यात आली होती. दरम्यान आजही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. हे संकट अद्यापही टळलेले नाही. कोरोनावर लस आली नसल्याने यावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान आहे. कोरोना काळात रुग्णालयात डॉक्टर , परिचारिका गेल्या आठ महिन्यांपासून अखंडित सेवा देत आहेत. त्यामध्ये महिला आणि परिचारिकांचा समावेश आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणू संक्रमण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेने सुद्धा खडा पहारा दिला. त्याचबरोबर परराज्य आणि इतर जिल्ह्यातील मजुरांना सुरक्षितपणे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून काम केले. टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली. त्यामध्ये महिला पोलिस अधिकारी कर्मचारी आघाडीवर होत्या. त्याचबरोबर स्वच्छता विषयक कर्मचाऱ्यांनीही आपला जीव धोक्यात घालून परिसर स्वच्छ ठेवला. त्यापैकी काहींना कोरोना विषाणूची लागण सुद्धा झाली. स्वच्छता दुतां मध्ये महिलांचाही समावेश आहे. कामोठे वसाहतीत अशाप्रकारे सेवा देणाऱ्या पनवेल मनपाच्या स्वच्छताविषयक महिला कर्मचाऱ्यांचा एकता सामाजिक संस्थेने शनिवारी सन्मान केला. सेक्टर 36 येथे संबंधित स्वच्छता दुत महिलांना नवरात्र उत्सवानिमित्त साडी चोळी देऊन ओटी भरण्यात आली. सणासुदीचे दिवस असल्यामुळे मिठाई चे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरणपूरक कापडी पिशव्या अणि कोरोनापासून रक्षणाकरिता मास्क चे वाटप करण्यात आले.

या माध्यमातून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आम्ही केलेल्या कामाची एकता सामाजिक संस्थेने खऱ्या अर्थाने दखल घेतली याबद्दल मनोमन समाधान वाटत असल्याचे महिला स्वच्छता दुतांनी सांगितले. यावेळी वैजूताई साळुंखे, उषाताई डुकरे, जयश्री झा, स्नेहल निबांळकर,सीमा घुले, अमोल शितोळे, मंगेश अढाव, अल्पेश माने, बापू साळुंखे, ऍड. समाधान काशीद प्रशांत कुंभार, दशरथ माने, जयकुमार डिगोळे, अजित चौकेकर, उमेश गायकवाड , हरीश बाब्रीया, समीर पाटील उपस्थित होते.

चौकट
नवरात्री दरवर्षी सामाजिक उपक्रमाचे आयोजन

आपण समाजाचं काही तरी देणं लागतो या भावनेने एकता सामाजिक संस्था, कामोठे सतत नवीनवीन सामाजिक उपक्रम हाती घेत असते. नवरात्री म्हणजे देवींची म्हणजे नारीशक्तीची पूजा म्हणून नवरात्रामध्ये केवळ दांडिया न खेळता खऱ्या स्वरूपात देवींची पूजा अणि सेवा आपल्या हातून घडावी म्हणून गेली दोन वर्षे एकता सामाजिक संस्था हा उपक्रम राबवित आहे. गेल्या वर्षी संस्थेच्या वतीने आदिवासी महिलांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याच धर्तीवर या वर्षी सुद्धा नारीशक्तीच्या सन्मानार्थ संस्थेच्या वतीने महिला स्वछता दूतांचा सन्मान करण्यात आला.

कोट

लॉकडाऊन अणि कोरोना संकटाच्या काळात सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून कामोठ्याकरांच्या आरोग्यासाठी ह्या महिलांनी अविरतपणे काम केले. नवरात्रीच्या दिवसांत देवींची ओटी भरण्याची प्रथा आहे. साक्षात देवीच त्यांच्या रूपाने कामोठे करांची काळजी घेत होती .या भावनेने एकता सामाजिक संस्थेच्या वतीने नवरात्रामध्ये महिला सफाई कामगारांची साडी चोळी देऊन ओटी भरण्यात आली. या प्रसंगी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या आदर सत्काराबद्दल आपला आनंद व्यक्त केला. सदैव समाजासाठी कार्यरत असणाऱ्या पण कायम दुर्लक्षित राहिलेल्या या घटकाला उचित मान सन्मान मिळवून देण्याचा हा एकताचा प्रयत्न असून त्यांनी केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

उषाताई डुकरे
सदस्य, एकता सामाजिक संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *