देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्व सामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार …

देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार
– राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पनवेल (हरेश साठे) कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी देवदूत प्रमाणे अतुलनीय कार्य केले. या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा करू तेवढी कमी असून कोरोनाच्या कष्टकाळात देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार मिळाला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे केले.
कोरोना वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करत देवदूताप्रमाणे प्रामाणिक कार्य करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवनमध्ये समारंभपूर्वक ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
दै. शिवनेरच्या वतीने बुधवारी सायंकाळी झालेल्या या समारंभाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी राज्यपालांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह डॉ. जगन्नाथराव हेगडे, डॉ. अमेय देसाई, प्रशांत कारूळकर आणि लीलाधर चव्हाण यांना ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, दै.रामप्रहरचे संपादक देवदास मटाले, अमोघ ठाकूर, स्वप्निल ठाकूर आदी उपस्थित होते.
राज्यपाल पुढे म्हणाले कि, अमेरिका प्रगतीशील देश आहे, तेथे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे मात्र तरीसुद्धा ते कोरोनावर मृत्यूदर कमी करू शकले नाही. कोरोना वैश्विक महामारीने जगभर थैमान घातले असताना भारतात कोरोनाचा मृत्युदर सर्वात कमी तसेच रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे, याचे श्रेय आपल्या देशातील सेवाभावी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक, समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्ती तसेच निःस्वार्थ सेवा करणाऱ्या करोना देवदूतांना जाते असेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी नमूद केले. कोरोनाला पूर्वी मोठ्या प्रमाणात घाबरायचे पण आता सर्वांच्या प्रयत्नातून हि भीती हळूहळू नष्ट होऊ लागली आहे. आपला देश धर्मप्रधान देश आहे, देशात विविध धर्म पंथाचे लोक एकत्रितपणे राहत असून सर्वाना धर्माप्रती आस्था आहे. भगवान बुद्धांची करुणा सर्वांच्या हृदयात सामावलेली आहे, असेही त्यांनी सांगताना देशातील एकात्मता सरस असल्याचे अधोरेखित केले. कोरोना आपल्या सारख्या लोकांच्या करुणामय स्वभावाने आणि कार्याने हरणारा आहे. त्यामुळे यापुढेही असेच सेवाभावी कार्य करत रहा, असा मार्गदर्शक सल्ला त्यांनी यावेळी दिला.
सोहळ्याचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे निमंत्रक व दै. शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली.

चौकट – ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे असले तरी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंच्या मदतीसाठी कधीही राजकारण केले नाही, सदैव आपल्याकडून कशी मदत होईल याचाच त्यांनी विचार केला. त्यामुळे लोकांवर आलेले कोणतेही संकट असो ते आपले आहे असे मानून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हाताने समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून काम केले. त्यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही त्यांची जनमानसावर प्रतिमा कोरली गेली. गेली अनेक वर्षे जनतेच्या लहानमोठ्या प्रश्नांकडे बारकाईने आणि जातीने लक्ष देणारे व सतत माणसांमध्ये रमणारे लोकनेते रामशेठ ठाकूर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेकांची उपजीविका अडचणीत आली. माणूस केवळ दौलतीने मेाठा होत नाही तर तो दानतीने आणि माणुसकीने मोठा होतो. याचे जिवंत उदाहरण म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पहिले जाते. कोरोना महामारी मध्ये आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लाखो जणांना मदतीचा हात दिला. त्यांनी स्वखर्चातून दिड लाखाहून अधिक अन्नधान्याचे किट, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नछत्र, गावाला जाण्यासाठी मदत, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वछता मोहिम, आर्थिक मदत, याखेरीज अर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझर, मास्कचे वाटप, गणपती सण गोड करण्यासाठी ६० हजार जणांना प्रसादासाठी अन्नधान्य, अशी हरएक आवश्यक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना झाली. महापूर असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती गोरगरिबांना मदत करणारे, विविध सामाजिक उपक्रम राबविणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने समाजाला कल्पवृक्ष मिळाला आहे त्यांचे कार्य समाजाला आदर्श आहे, त्यामुळेच त्यांना समाजात मान सन्मान आणि त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यांनी कोरोना काळात समाजाला स्वतःचे कुटुंब मानून केलेल्या मदतीची व दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने केलेला हा सन्मान म्हणजेच पनवेलसह रायगडचा सन्मान होता. असे चित्र या सोहळ्यात प्रकट होत होता.

कोट-
लहानपणापासून खूप काबाडकष्ट केले, कष्टाने आर्थिक सुबकता आली असली तरी ते दिवस विसरायचे नाही हे मनात ध्येय कायम ठेवले. मी व्यवसायात कोटी रुपये कमवले पण ते माझे नाही त्यात समाजाचा वाटा आहे असे मी मानतो म्हणून मी समाजासाठी मदत करण्याचा प्रयत्न करतो. पक्षविरहीत काम करणे हा आपला आत्मा आहे.त्यामुळेच कार्य करण्याची ऊर्जा मिळते. कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत, आदर्श व पितृतुल्य व्यक्तिमत्त्व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा अत्यानंद आहे.
– लोकनेते रामशेठ ठाकूर

कोट-

कोरोना काळात डॉक्टर, नर्स, पोलीस यांनी अद्वितीय कार्य केले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही या काळात केलेले काम मोठे आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आमदार पदाची पर्वा न करता टोल संदर्भात आंदोलन उभारून टोल विरोधात सर्वसामान्यांचा आवाज बुलंद केला. रायगमध्ये विकासाचे आणि शिक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्याचे कार्य लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले असून ते जननायकाची भूमिका पार पाडत आहेत. त्यांच्या कार्याला माझा नेहमी सलाम. महाराष्ट्राने आम्हाला खूप मोठे केले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांची परंपरा आपण कधीही विसरू शकत नाही. -माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *