पनवेल शहरासह कळंबोली वसाहतीमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी टोईंग व्हॅन पुन्हा कार्यरत….

पनवेल शहरासह कळंबोली वसाहतीमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी टोईंग व्हॅन पुन्हा कार्यरत…
पनवेल, दि.13 (संजय कदम) ः कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गेले 7 महिन्यापासून पनवेल शहरासह कळंबोली वसाहतीमध्ये वाहतूक शाखेची टोईंग व्हॅन बंद होत्या. परंतु सध्या परिस्थिती पूर्ववत सुरू झाल्याने पनवेलसह कळंबोली वाहतूक शाखेने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपल्या टोईंग व्हॅन पुन्हा रस्त्यावर आणल्या आहेत.
लॉकडाऊन नंतर शासनाने हळुहळु प्रमाणात विविध उद्योगधंदे करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरी भागात व्यवसायानिमित्त तसेच खरेदी करण्यानिमित्त मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक आपली दुचाकी तसेच चार चाकी वाहने घेवून येतात. यातूनच पूर्वीसारखा वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हा सोडविण्यासाठी त्याचप्रमाणे बेजबाबदारपणे आपली वाहने रस्त्याच्या नियमांचे पालन न करता उभी करून ठेवणार्‍या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी गेल्या 7 महिन्यापासून बंद असलेली टोईंग व्हॅन आजपासून पुर्ववत सुरू झाली आहे. अनेक वाहन चालक गाफील असल्यामुळे आज त्यांना वाहने उचलल्यावर टोईंग व्हॅनची आठवण झाली. सध्या ऑनलाईन प्रक्रिया सुरू असल्याने अनेक वाहन चालकांनी रोख रक्कम भरण्यास नकार देवून ऑनलाईन भरण्याची मुभा घेतली आहे. या टोईंग व्हॅनमुळे बिघडलेली वाहतुकीची शिस्त पुन्हा पुर्ववत होणार आहे. यासाठी काही कालावधी जावू शकतो. आगामी नवरात्रो, दिवाळी आदी सणानिमित्त शहरी भागात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत असते. अशा वेळी ही टोईंग व्हॅन शिस्त लावण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
फोटो ः पनवेल शहरात सुरू झालेली टोईंग व्हॅन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *