रायगड जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी केला संत निरंकारी मंडळाचा सन्मान..

रायगड जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी केला संत निरंकारी मंडळाचा सन्मान


महाड इमारत दुर्घटनेत केलेल्या मदत कार्याची शासनाने घेतली दखल


संत निरंकारी मंडळ मागील ९० वर्षांपासून आध्यात्मिक जागरुकतेच्या आपल्या मुलभूत विचारधारेद्वारे मानवाचा गुणात्मक विकास करण्याबरोबरच सामाजिक उत्थान, मदत व पुनर्वसन कार्यामध्ये आपले योगदान देत आहे. 24 ऑगस्ट रोजी महाड शहरातील तारिक गार्डन इमारत कोसळून दुर्घटना घडली होती. सदर दुर्घटनेत शोध व बचाव कार्यामध्ये संत निरंकारी मंडळ (रजि.) दिल्ली अंतर्गत शाखा-महाड सेवादल युनिट 357 महाडच्या सेवादलांनी तात्काळ केंद्रीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मोलाचे योगदान दिल्याबद्दल रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी व रायगड जिल्हा पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांचे हस्ते संत निरंकारी मंडळाचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सदर सन्मान संत निरंकारी मंडळाचे रायगड क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील, महाड-शाखा संयोजक दयाळ पारधी, सेवादल महाड युनिट शिक्षक अनिल सकपाळ यांनी स्वीकारला.
संत निरंकारी मंडळाच्या वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज या प्रेम व बंधुत्वाच्या मिशनला आपल्या दिव्य मार्गदर्शनाने पुढे घेऊन जात आहेत. मिशनची समाज कल्याण शाखा असलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनेही वर्तमान परिस्थितीमध्ये उपयुक्त ठरतील असे विविध उपक्रम राबवत आहे.
शुक्रवारी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे पार पडलेल्या सन्मान सोहळयामध्ये महाड शहरातील तारिक गार्डन इमारत कोसळून दुर्घटनेत शोध व बचाव कार्यामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सर्व सामाजिक संस्था, स्वयंसेवक, रेस्क्यू टीमचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात आवर्जून संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान तसेच विविध सामाजिक उपक्रमाचा उल्लेख करून योगदानाचे कौतुक केले तर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी देखील महाड इमारत दुर्घटनेत केलेल्या मदत कार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले व दिलेल्या प्रशस्तीपत्रामध्ये इमारत दुर्घटनेच्या प्रसंगी अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने कर्तव्य बजावून उत्तम कार्य केल्याचे नमूद करून मदत कार्यात केलेली कामगिरी निश्चितच महत्वपूर्ण व दखलपात्र अशी असून केवळ कर्तव्य म्हणून न्हवे तर भावनिक व सामाजिक जबाबदारीने लोकांचे प्राण वाचविण्याकरिता अहोरात्र मदत केली त्याची दखल शासन म्हणून घेऊन आपत्तीच्या काळात मदत कार्यास तत्परतेने धावून येण्याची परंपरा आपण यापुढेही कायम ठेवाल अशी अपेक्षा नमूद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *