पत्रकारांसाठी विमा कवच आणि उपचारार्थ बेड उपलब्ध करून देण्याची मागणी..

पत्रकारांसाठी विमा कवच आणि उपचारार्थ बेड उपलब्ध करून देण्याची मागणी

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले निवेदन.

नुकतेच रायगड मधील डॅशिंग पत्रकार संतोष पवार यांचे कोरोनामुळे निधन झाले. तत्पूर्वी पुण्यामध्ये पांडुरंग रायकर यांचा कोविड मुळे झालेला मृत्यू जीवाला चटका लावून गेला. या दोन पत्रकार बांधवांसह अन्य बारा पत्रकार बांधवांचा महामारी च्या कालखंडात राज्यात मृत्यू झाला आहे. अन्य पत्रकार बांधवांवर अशी वेळ येऊ नये म्हणून वेळीच सावध होत प्रशासनाकडे पत्रकारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे बाबत आज राज्यभरात आंदोलने करण्यात आली. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेलच्या तहसील कार्यालयात नायब तहसीलदार एन डी गांगुर्डे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
संतोष पवार आणि पांडुरंग रायकर हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बळी गेले असल्याचे आरोप होत आहेत. कोरोना महामारी या कालखंडात लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. असे असले तरी पत्रकार बांधवांना विषाणूची लागण झाल्यास त्यांच्या उपचारार्थ सुविधा नाही किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांना विम्याचे कुठलेही संरक्षण नाही. या दोन मुख्य मागण्यांसाठी राज्यभरातील पत्रकार संघटनांनी विविध ठिकाणी आंदोलन केले.
पत्रकारांसाठी शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या विमा संरक्षणाचे बाबत केवळ वेळ काढू पणाचे धोरण सुरू आहे. याबाबत अंतिम मसुदा तात्काळ निर्माण करून पत्रकारांना त्यांच्या विमा संरक्षणाची कागदपत्रे शक्य तितक्या लवकर प्रदान करावेत अशी मागणी जोर धरत आहे.पनवेल महानगरपालिकेने पत्रकारांसाठी काही ठिकाणी बेड राखून ठेवले असले तरीदेखील त्यांची संख्या तुटपुंजी आहे, तसेच पत्रकारांच्या कुटुंबियांना लागण झाल्यास त्याबाबत काय? हे अद्यापही चित्र स्पष्ट नाही.
तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देताना संघटनेच्यावतीने अध्यक्ष निलेश सोनावणे, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार सुनील दादा पोतदार,सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, कार्याध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस मंदार दोंदे,अनिल भोळे,अनिल कुरघोडे, प्रविण मोहोकर,भालचंद्र (बाळू) जुमलेदार आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *