रुग्णालय व्यवस्थापनाच्या धोरणाबद्दल तीव्र नाराजी एकता सामाजिक संस्थेने उठवला आवाज

खाजगी कोविड रुग्णालयात डिपॉझिटसाठी अडवणुक
पहिले पैसे भरा… मगच रुग्णाला दाखल करून घेऊ
रुग्णालय व्यवस्थापनाच्या धोरणाबद्दल तीव्र नाराजी
एकता सामाजिक संस्थेने उठवला आवाज
पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी कोविड रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करून घेण्या  अगोदर डिपॉझिट भरून घेतले जात आहे. अन्यथा त्या ठिकाणी उपचार नाकारले  जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. रुग्णालय व्यवस्थापनाकडून रुग्णांच्या नातेवाईकांची अडवणूक केली जात आहे. यासंदर्भात एकता सामाजिक संस्थेने आवाज उठवला आहे. डिपॉझिटच्या कारणावरून रुग्णांचे उपचार थांबू नयेत अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा विचार करिता दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चालली आहे. सध्या पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि एमजीएम कामोठे हे दोनच जिल्हा कोविड हॉस्पिटल आहे. इतर रुग्णालय हे खाजगी कोविड हॉस्पिटल्स आहेत. पनवेल महानगरपालिका कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी संबंधितांना दिली आहे. दरम्यान तेथे वैद्यकीय उपचार करीत असताना शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार बिल घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.  अनेक पळवाटा शोधून खाजगी रुग्णालय रुग्णांना लुटत आहेत. इतकेच नाही तर  70-80 हजार अनामत रक्कम मागत आहेत. पहिले पैसे भरा त्यानंतरच रुग्णाला दाखल करून घेऊ अशा प्रकारे रुग्णालय प्रशासन बेजबाबदारपणे वागत आहेत. दरम्यान यासंदर्भात महापालिकेचे अधिकार्‍यांना तसेच टोल फ्री नंबरवर संपर्क साधला असता. त्यांच्याकडून कोणतीही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
कामोठे सेक्टर 14 मधील एक 48 वर्षीय व्यक्ती कोविड- 19 बाधित झाली. त्यानंतर त्यांना देवांशी इन येथे उचारासाठी नेण्यात आले. पण तिथे  एक्स-रे तसेच  इतर कोणत्याही टेस्ट केल्या नाहीत. त्यांना फक्त जुबजुबी औषधे देण्यात आले. त्यानंतर तुम्ही कोविड- 19 मुक्त झालात असे जाहीर करून तीन सप्टेंबर ला त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु   6 सप्टेंबरला  त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला, आणि नातेवाईकांनी हॉस्पिटलसाठी शोधाशोध सुरु केली, परंतु नेहमी प्रमाणे पनवेलची शोकांतिका सामोरी आली. त्यांनी कळंबोली येथील हॉस्पिटल मध्ये चौकशी केली असता त्यांनी 70 हजार अनामत रक्कम मागितली. परंतु त्वरित 70 हजार भरण्यास नसल्याने रुग्ण दाखल करून घेतला नाही, अनामत रक्कम नसेल तरीही  उपचार करणे बंधनकारक आहे हे महाराष्ट्र शासनाचे  परिपत्रक आहे. याला रुग्णालयांकडून सरळ-सरळ हरताळ फासला जात आहे . शेवटी संबंधित रुग्णाला कोणताच पर्याय नसल्याने वाशी मनपाच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथेही पनवेलचे रहिवाशी असल्याने त्वरित उपचार मिळणे कठीण झाले. शेवटी रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल 38 वर आल्यावर त्यांनी रुग्णाला दाखल करून घेतले.
चौकट
पनवेल पालिकेचा गलथान कारभार
 अनेक रुग्ण पनवेल पालिकेच्या गलथानपणाचा शिकार झाले आहेत. संबंधितांना योग्य पद्धतीने सल्ला दिला जात नाही. त्यामुळे रुग्णाने नातेवाईकांना इकडून तिकडे फिरावे लागते. त्यामुळे कित्येकदा रुग्णांचा जीव धोक्यात सापडतो. पनवेल महापालिकेच्या  हेल्प लाईन नंबर उचलले जात नाहीत . ते सतत व्यस्त दाखवण्यात येतात. कोरोनाची महामारी असताना हि पालिका प्रशासन अपुरे पडत आहे. अधिकारी वर्गात अजूनही नागरिकांबाबत गांभीर्य नाही असे दिसून येत नाही. असे मत सामाजिक संस्थेचे अमोल शितोळे यांनी व्यक्त केले आहे.
कोट
प्रशासनाने लक्ष घालून यात सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व हॉस्पिटलची बैठक घेऊन हा प्रकार पुन्हा घडू नये याबाबत सूचना कराव्यात. रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना हेल्पलाईन वरून योग्य ती माहिती मिळावी जेणेकरून त्यांची ससेहोलपट होणार नाही. त्याचबरोबर खाजगी रुग्णालयांनी डिपॉझिट दिले नाही म्हणून उपचार थांबू नयेत अशा प्रकारच्या सूचना संबंधित व्यवस्थापनाला देण्यात याव्यात . अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
अमोल शितोळे
एकता सामाजिक संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *