पनवेल महापौर सहाय्यता निधीत चिमुकल्याची मदत-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
पनवेल दि.०९.०४.२०२०
पनवेल महानगरपालिकेने पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी महापौर सहाय्यता निधीची स्थापना केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल व नवी मुंबई परिसरातून वरील निधीत भरघोस मदत केली जात असताना स्थानिक लोकांसाठी अशा निधीची गरज होती. हे ओळखून आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी महानगरपालिकेच्या पदाधिका-यांशी समन्वय साधून महापौर सहाय्यता निधीची स्थापना केली. या निधीतून कोरोनाशी लढण्यास मदत होईल. अनेकांना काही ना काही मदत करायची असते. पण नक्की काय मदत करावी हे सुचत नाही. अनेकदा वस्तू देऊन त्याचा पुरेसा वापर न झाल्यास त्या वस्तू निरुपयोगी ठरतात. अशावेळी फूल ना फुलाची पाकळी अशी मदत करण्यासाठी महापौर सहाय्यता निधी उपयुक्त आहे.
कालच मा. महापौर डाॅ. कविता चौतमोल व मा.आयुक्त गणेश देशमुख यांनी महापौर सहाय्यता निधीत योगदान देण्यासाठी आवाहन केले असता, मा.विरोधी पक्ष नेते डाॅ.प्रितम म्हात्रे व मा. सभागृह नेते डाॅ.परेश ठाकूर यांनी आपापल्या सदस्यांचे मानधन तात्काळ महापौर सहाय्यता निधीत जमा करण्याची घोषणा करून तसे लगेच पत्र दिले.
याचवेळी ऑनलाईन पेमेंट करून महापौर सहाय्यता निधीत पहिली मदत जमा करणारे श्री.नीरज सुभाष यांनी चकित केले व पहिले प्रत्यक्ष पैसे जमा करणारे ठरले.
या पेक्षा चकित करणारे व उत्तम उदाहरण म्हणजे एका चिमुकल्याची वाढदिवसाची खर्चाची रक्कम महापौर सहाय्यता निधीत जमा करणे.
साईराज अमोल शितोळे ह्या चिमुकल्याने 6 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ₹ 5000/- चा चेक पनवेल महानगरपालिका ,महापौर सहायता निधीला आज दिला. श्री अमोल शितोळे हे कामोठे येथिल रहिवासी असून एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते समाजकार्यात सक्रिय असतात. त्यांच्या प्रमाणेच त्यांचा मुलगा अशा योगदानाने चर्चेत आला आहे. श्री.शितोळे व त्यांचे चिरंजीव साईराज यांचे विशेष कौतुक व अभिनंदन उपायुक्त जमीर लेंगरेकर व मुख्य लेखा अधिकारी शहाजी भोसले यांनी केले आहे.
इतरांनी देखील श्री.शितोळे यांचे अनुकरण करावे असेच उदाहरण आहे.