मुस्लिम नागरिकहो बाहेर पडू नका
‘शब-ए-बरात’ साठी नागरिकांना घराबाहेर न पडता घरातून नमाज पठण करावे व आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन मुस्लिम नेते सय्यद अकबर यांनी केले आहे.
गुरुवार(९एप्रिल)रोजी मुस्लिम समाजातर्फे शब-ए-बरात साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी रात्रभर मशिदीमध्ये नमाज पठण केले जाते. कब्रस्थानमध्ये जाऊन आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. या दिवशी मुस्लिम समाजातर्फे दानधर्म ही केला जातो.परंतु यावेळी कोरोना या महाभयंकर विषाणूने देशभर थैमान घातले असून कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे देशभरात लॉकडाऊनची बंधने पाळत मुस्लिम बांधवानी घराबाहेर पडू नये असे आवाहन सय्यद यांनी केले आहे.
शब-ए-बरात निमित्ताने कब्रस्थानामध्ये आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र त्यासाठी कब्रस्थानमध्येच गेले पाहिजे असे नाही.आपापल्या घरी बसून कुराण व नमाज पठण करून श्रद्धांजली अर्पण करता येऊ शकते.आपण जे वाचन,पठण करतो त्यातून हा संदेश पोहोचतो.त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे निमित्त करून कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन मुस्लिम नेते सय्यद यांनी केले आहे.