पनवेल महानगरपालिकेचे पर्यवेक्षक औषध फवारणी व धुर फवारणीचे अधिकारी सचिन दुन्द्रेकर ठरतात खर्‍या अर्थाने कोव्हीड योद्धा..

पनवेल महानगरपालिकेचे पर्यवेक्षक औषध फवारणी व धुर फवारणीचे अधिकारी सचिन दुन्द्रेकर ठरतात खर्‍या अर्थाने कोव्हीड योद्धा
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः कोरोना विषाणूची लागण पनवेल शहरात होताच गेल्या सहा महिन्यापासून या रोगाविरुद्ध लढण्यासाठी अनेक जण जीवाची बाजी लावत आहेत. आज आपले घर दार विसरुन पनवेल कोरोनामुक्त करण्यासाठी अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी लढत आहेत. त्यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे पर्यवेक्षक औषध फवारणी व धुर फवारणीचे अधिकारी सचिन दुन्द्रेकर सुद्धा खर्‍या अर्थाने कोव्हीड योद्धा म्हणून सर्वांसमोर येत आहेत.
गेल्या सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीत त्यांना देण्यात आलेली पनवेल महानगरपालिकेची जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्‍यांच्या साथीने पार पाडली असून आजही तात्काळ फोन केल्यानंतर पनवेलकरांच्या सेवेसाठी ते हजर असतात. पनवेल महानगरपालिकेकडून त्यांना कोरोना रुग्णांची माहिती मिळताच ते त्या घरी जावून त्या रुग्णांचे घर, परिसर व सोसायटी औषध फवारणी सॅनिटायझर फवारणी व धुर फवारणी करून घेतात. जेणेकरून कोरोनाची लागण इतरांना होवू नये. हे काम सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरूच असते. दरम्यानच्या काळात रुग्णांना ने-आण करणारी रुग्णवाहिका ही प्रत्येक रुग्णानंतर ते सॅनिटायझर करून देत असतात. त्याशिवाय सदर गाडी बाहेर काढून देत नाहीत. एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्या मृतदेहाला सॅनिटायझर करणे, अमरधाम असो किंवा दफनभूमी असो त्या भागात सॅनिटायझर करणे, त्यासाठी येणारी शववाहिनी तेथील कर्मचारी यांना सॅनिटायझर तात्काळ करण्याचे काम त्यांचे पथक करत असते. यासाठी महापालिकेत 24 तास एक कर्मचारी ठेवण्यात आला आहे व त्याला माहिती मिळताच तो आपल्या पथकासह त्या ठिकाणी जातो. सचिन दुन्द्रेकर यांनी आतापर्यंत पनवेल परिसर व काळुंद्रे परिसरातल 850 च्या वर इमारतीमध्ये व घरांमध्ये सॅनिटायझर, धुर फवारणी, औषध फवारणी केली आहे. पनवेल शहरातून कोरोना पूर्णपणे निघून जाईपर्यंत ही सेवा महापालिकेच्या माध्यमातून देत राहणार आहेत. यासाठी त्यांना आयुक्तांसह महापौर व इतर सर्व नगसेवक, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य नेहमीच लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वेळा एखाद्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ होतो. परंतु कित्येकदा रुग्णांचा आकडा वाढत असल्याने तात्काळ त्या ठिकाणी जाता येत नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. तरी सुद्धा रात्री उशिरापर्यंत आमचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळेच ते खर्‍या अर्थाने एखाद्या कोव्हीड योद्धाप्रमाणे आपली भूमिका बजावित आहेत व त्यांचे पनवेलकर कौतुक करीत आहेत.
फोटो ः सचिन दुन्द्रेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *