1 सप्टेंबरपासून पनवेल तालुक्यातील रेशनिंग दुकानदार धान्य उचल व वितरण करणार बंद…

1 सप्टेंबरपासून पनवेल तालुक्यातील रेशनिंग दुकानदार धान्य उचल व वितरण करणार बंद
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स संघटना फेडरेशन पुणे यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठींबा
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ईपॉज मशिनद्वारे धान्य वितरण करण्यास स्थगितीबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने आदेश दिले आहेत. त्याला चार आठवडे झाले मात्र त्यावर सरकारचा अद्याप निर्णय झालेला नाही. कोरोना महामारीत रेशनिंग दुकानदार अविरतपणे सेवा देत आहेत. परंतु शासनाला याची जाणीव नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या राज्यव्यापी आंदोलनाला रास्त भाव दुकान वेल्फेअर असोसिएशन पनवेल यांचा पूर्ण पाठींबा असून 1 सप्टेंबरपासून पनवेल तालुक्यातील रेशनिंग दुकानदार धान्य उचल व वितरण बंद करणार आहेत, असे संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला कळविले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कार्डधारकांचे अंगठ्यांचे ठसे घेवून ई पॉज मशिनवर धान्य वितरण करण्यासाठी दुकानदारांना सक्ती करण्यात येत असून दुकानदारांचा ग्राहकांचे अंगठे घेण्याला सक्त विरोध आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कोरोना महामारी संक्रमण वाढत असून रुग्णांची संख्या 10 हजाराहून अधिक असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील दुकानदार देखील कोरोना संक्रमीत असून दुकानदारांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार 17 मार्च पासून सर्व शासकीय, निमशासकीय तसेच दुकानात ई-पॉज बायामेट्रीक थंब्सच्या वापरावर मनाई करण्यात आली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ई-पॉज मशिनवर अंगठे घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. याबद्दल दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत धान्य वाटप केलेल्या वितरणाचे कमिशन देखील अद्याप पर्यंत दिले गेलेले नाही. ते कमिशन त्वरित रेशनिंग दुकानदारांना अदा करावे. तसेच रेशनिंग दुकानदार कोरोना बाधीत होत आहेत, मृत्यूमुखी पडत आहेत. त्यांचा संसार उघड्यावर येत आहे. याचा शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी मागणी निवेदनातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *