तळोजा फेज वनला जोडणारा सबवे सुरु करा – भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांची मागणी
पनवेल(प्रतिनिधी) तळोजा फेज वनला जोडणारा सबवे लवकरात-लवकर सुरु करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी सिडकोकडे केली आहे.
या संदर्भात केणी यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना लेखी निवेदन दिले आहे. तळोजा फेज वन येथे जाण्यासाठी कच्चा रस्ता करण्यात आलेला आहे. परंतु काही दिवसात पावसाळा सुरु होणार असून हा रस्ता कच्चा असल्यामुळे चिखल तयार होऊन नागरिकांना ये- जा करण्यासाठी गैरसोय होणार आहे. फेज वन ला जोडण्यासाठी सबवे बनविण्यात आला असून सध्यस्थितीत तो बंद आहे. त्यामुळे येणारा पावसाळा आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता फेज वन ला जोडणारा सबवे पावसाळ्यापूर्वी सुरु करण्यात यावा, अशी मागणी प्रल्हाद केणी यांनी सिडकोकडे केली असून यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनाही निवेदनाची प्रत माहितीस्तव देण्यात आली आहे.