पनवेल वार्ता न्यूज!नवेल हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात सुरु झाले महिला सहाय्यता कक्ष.
नवेल हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात सुरु झाले महिला सहाय्यता कक्ष
पनवेल दि.२२(वार्ताहर): पनवेल हद्दीसह नवी मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात महिलांना भेडसावणाऱ्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी महिला सहाय्यता कक्ष सुरु करण्याचा निर्णय नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतला आहे. पोलिस आयुक्तांच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासह त्यांच्या समस्यांचे निरसन होण्यास मदत मिळणार असल्याने पोलिस आयुक्तांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
पनवेल परिसरासह नवी मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला सहायता कक्ष सुरू झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ व परिमंडळ २ या परिमंडळ विभागामध्ये यापुर्वीच महिला सुरक्षा पेट्रोलींग सुरू करण्यात आलेली आहे. सदर पेट्रोलींगसाठी महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांची नेमणुक करण्यात येत असते. सदरच्या पेट्रोलींग मोबाईलकडुन सार्वजनिक ठिकाणावर महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलींग केली जाते तसेच नियंत्रण कक्षाकडुन महिला विषयक प्राप्त तक्रारीस त्वरीत व संदेवनशीलपणे प्रतिसाद दिला जातो. त्याचप्रमाणे महिला सुरक्षा संदर्भात पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तत्परता दाखवत महिला सहाय्यता कक्ष प्रत्येक पोलीस ठाण्यात सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरु झाले असल्याने महिलांची होणारी धावपळ थांबण्यास मदत मिळणार आहे.