पनवेल वार्ता न्यूज!लोकवर्गणी लोकसहभागातून प्रॉपर्टी कार्ड हक्काची सुरवात.

लोकवर्गणी लोकसहभागातून प्रॉपर्टी कार्ड हक्काची सुरवात.

उरण दि 22(विठ्ठल ममताबादे )उरण- बालई काळाधोंडा गावठाण विकास परिषदे मार्फत आगरी कोळी कराडी चर्मकार, मातंग बारा बलुतेदार यांनी आपल्या संविधानीक निवारा हक्कासाठी रणशिंग फुंकले आहे.1932 साली इंग्रजांनी केलेल्या गावठाण घराचे नकाशे केंद्र आणि राज्य सरकारने गावातील वाढत्या लोकसंख्यानुसार नकाशे बनविले नाहीत.

1938 साली अलिबाग- चरी येथे कसेल त्याची जमिन आणि राहील त्याचे घर हे जमिन हक्काचे आंदोलन भूमिहिन एसी एससी, एसटी यांनी यशस्वी केले . मात्र उच्चवर्णीय खोत सावकार आणि सरकारी जागांवरील मागासवर्गीय कुळ्यांच्या,वहिवाटीच्या ताब्याच्या, मालकिच्या नोंदी घेण्याचा कुळ कायदा साऱ्या देशातील नागरिकांना लागू झाला.1 एप्रिल 1950 साली जो जमिनीवर राहत होता किंवा जमिन कसत होता त्यांना जमिन मालकी मिळू लागली.

मनुस्मृतीने जसे मागासवर्गीय पुरुषांना प्रॉपर्टी- जमीन हक्क नाकारले होते. तसेच लोकसंख्येच्या 50% असलेल्या स्त्रियांनाही नाकारले होते. याबाबतीत लोकप्रबोधन झाले नसल्यामुळे वारसा हक असेल किंवा पतीच्या घरावरील पत्नीचा अधिकार विविध समाज नाकारत आला आहे.

सरकारी निष्क्रीयता एवढी भयानक आहे कि 1932 नंतर वाढलेल्या गावठाणाची नोंद न घेणारे तलाठी- तहसिलदार भूमिअभिलेख आज मूग गिळून गप्प असल्याने सिडकोने चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील हजारो घरे अनधिकृत ठरवून तोडक कारवाईच्या नोटीसा काढून पोलीसांच्या मदतीने एमआरटीपी कायद्याने तोडक कारवाई सुरु केली आहे.

भूमीपुत्र आगरी कोळी ओबीसी बांधवांच्या अधिकारात असलेल्या महाराष्ट्र जमिन महसूल जमीन अधिनियम 1966 च्या कलम 122 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1967 ची अमलबजावणी न करता होणाऱ्या या कारवाई बाबत सिडको अतिक्रमण विभाग आणि उरण पोलीस स्टेशच्या अधिका-यांविरोधात गुन्हे नोंदविण्यासाठी उरणच्या मातृसत्ताक महिला पूढे येत आहेत.

या जमिन हक्क आंदोलनाचा भाग म्हणून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबईतील गावठाण चळवळीच्या नेतृत्वाची धुरा महिला सांभाळणार आहेत. मनुस्मृतीने महिलांना जमिन मालकी हक्क नाकारले म्हणून मनुस्मृती जाळणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरोनी हिंदू कोड वरील बिल संविधान सभेत मांडले.यातील संविधानाचा आदर्श घेत दि. 19/1/2023 रोजी सकाळी 10 वाजता बालई- उरण येथील महाभद्रा निवास इमारती पासून महिला आणि पुरुष यांना स्त्रीपुरुष समानतेच्या अधिकारांचे प्रॉपर्टीकार्ड मिळावे यासाठी महिलेच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वंदना विनोद सावर्डेकर, सपना पाटील, शकुंतला दयाराम पाटील, सुमिता धायफळे आदी महिला उपस्थित होत्या तसेच बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेतर्फे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वेअर रामनाथ कोळी , सचिव रविंद्र चव्हाण , अध्यक्ष -विश्वनाथ पाटील,सदस्य रणजित विनेरकर, विजय चव्हाण,महेंद्र पवार, बाबल्या चव्हाण, राहुल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील आणि गावठाण चळवळीचे राजाराम पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *