अमेया लॉजिस्टीकने जपली सामाजिक बांधिलकी – खोपटे गावकऱ्यांना दिले अन्नधान्यासह सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनिंग मशीन
पनवेल दि.27 (वार्ताहर)- एकीकडे उरण तालुक्यात गावोगावी वसलेले अनेक कंटेनर यार्ड स्थानिक गावकरी वर्गासाठी काहीच करीत नसल्याची ओरड आहे त्याचवेळी खोपटे गावातील अमेया लॉजीस्टिक पार्क मात्र याला अपवाद ठरत आहे. खोपटे गावातील धसाखोशी पाड्याजवळ वसलेल्या अमेया लॉजिस्टिक पार्क नामक कंटेनर यार्डने मात्र आपली सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे समोर आले आहे.
कंपनीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे सी ई ओ पर्सी वापीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली खोपटा गावातील गरजू नागरीकांसाठी तांदुळ वाटप केले आहे. त्याचबरोबर खोपटे गावातील घरोघरी वाटपासाठी सॅनिटायझर आणि गावच्या बांधापाडा ग्रामपंचायतीकडे एक थर्मल स्कॅनिंग मशीन ही सुपूर्द केली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी राहील निगम यांनी बोलतांना दिली आहे. कंपनीच्या वतीने गावातील गरजूंकरिता सुरुवातीच्या काळात ८०० किलो आणि त्यानंतर १२५० किलो असे एकूण २०५० किलो चांगल्या प्रतीचा तांदूळ बांधपाडा ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. खोपटे गावातील नागरिकांना कोरोना महामारीचा प्रादुर्भाव होऊ नये या करिता गावामध्ये अमेया लॉजिस्टीकच्या माध्यमातून जंतूनाशक फवारणी करण्यात आली.
त्याचप्रमाणे गावातील नागरिकांसाठी बांधपाडा ग्रामपंचायतीकडे १३५० छोट्या आकाराच्या सॅनिटायझरच्या बॉट्लस ही मोफत देण्यात आल्याची माहिती राहील निगम यांनी बोलतांना दिली आहे. खोपटे गावाकरिता बांधपाडा ग्रामपंचायतीकडे एक थर्मल स्कॅनिंग मशीन देखील सुपूर्द करण्यात आली आहे. खोपटे गावाच्या करिता सातत्याने काही ना काही करण्याची तयारी दाखविणाऱ्या अमेया लॉजिस्टिक पार्कने यापूर्वी खोपटे भागशाळेतील वीज वायरिंग सारखी कामे ही केली आहेत. कंपनीकडून गावकऱ्यांसाठी केल्या जात असलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल गावातील नागरिकांनी कंपनी व्यवस्थापनाला धन्यवाद दिले.
फोटोः अमेया लॉजिस्टीकतर्फे अन्नधान्यासह सॅनिटायझर आणि थर्मल स्कॅनिंग मशीनची व्यवस्था