डिझेलचोरांचा पनवेल परिसरात धुमाकूळ; वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण.

डिझेलचोरांचा पनवेल परिसरात धुमाकूळ; वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण
पनवेल दि.१५ (संजय कदम): पनवेल तालुक्यात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी गाडीतील डिझेल चोरीला गेल्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून १९ हजार ३०० रुपये किमतीचे २०५ लिटर डिझेल चोरुन नेले आहे. या घटनांची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
निवृत्ती ईश्वर करांडे हे जे.डब्ल्यु.आर कंपनी जवळ, जेएनपीटी रोडवर त्यांच्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रेलर (एनएल ०१ एबी ७२८७) रस्त्याच्या कडेला बंद व उभी करुन गाडीतच झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने गाडीचे डिझेल टॅकचे लॉक तोडून त्यामधील ६,५८० रुपये किमतीचे ७० लिटर डिझेल चोरून नेले. तर दुसऱ्या घटनेत रुपेश परशुराम भोईर ह्यांनी गाढी नदीच्या पुलावर, टी पॉईंट ते कळंबोली जाणा-या रोडवर १४ चाकी ट्रेलर (एमएच ४६ एएफ 5320) पार्क करुन ठेवला असता अज्ञात इसमाने ट्रेलरमधून ५ हजार रुपये किंमतीचे ५५ लिटर डिझेल चोरी केले. तसेच तिसऱ्या घटनेत बाकीराव कट्टरवडे यांनी त्यांच्या ताब्यातील अशोक लेयलैंड कंपनीचा ट्रक (एमएच २३ डब्ल्यु ५०४६) रस्त्याच्या कडेला उभी करुन गाडीतच झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने गाडीचे डिझेल टॅकचे लॉक तोडून त्यामधील ७,७२० रुपये किमतीचे ८० लिटर चोरून नेले. तालुक्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी गाडीतील डिझेल चोरीला गेल्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व वाहनचालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *