रोटरी कर्णबधीर विशेष निवासी शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरा.
रोटरी कर्णबधीर विशेष निवासी शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे
पनवेल दि.२६ (वार्ताहर) : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. श्रीम. राधाबाई खेमचंद परमार रोटरी कर्णबधीर मुलांसाठी विशेष निवासी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच सेंट जॉर्ज कॅथलिक चर्च, नवीन पनवेल येथे उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे माजी चेअरमन कै. रतनचंदजी करवा यांच्या पत्नी श्रीम. कलावती रतनचंद करवा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी संस्थेचे चेअरमन अरविंद सावळेकर, सचिव प्रमोद वालेकर, खजिनदार डॉ. प्रमोद गांधी, रोटरी क्लब अध्यक्ष कल्पेश परमार, ट्रस्टचे माजी चेअरमन सुधीर कांडपिळे, रोटेरीयन्स, इनरव्हिल क्लब च्या अध्यक्षा कल्पना नागावकर, माजी अध्यक्षा वृषाली सावळेकर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शैला बंदसोडे, पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. श्रीमती कलावती करवा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका शैला बंदसोडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, सोलो डान्स, नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्याच बरोबर कोळी नृत्य गोवन नृत्य, भांगडा डान्स, साऊथ इंडियन मिक्स, शेतकरी नृत्य सादर करुन विद्यार्थ्यांनी आपले कला गुण व कौशल्य सर्वांसमोर सादर केले. शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका शैला बंदसोडे यांनी अहवाल वाचन करुन मागील 2 वर्षात झालेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहीती दिली. या बहारदार कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. मनिषा गुंजाळ यांनी केले. यावेळी कै. कलाताई जोशी, अध्यक्षा जानकीबाई आपटे, मुकवधीर विद्यालय अहमदनगर यांच्या जयंती दिनी आयोजित वाचा कौशल्य व अध्यापन कौशल्य ही कर्णबधीर विद्यार्थी आणि विशेष शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा, राज्य स्तरीय ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली होती. यात शाळेतील इ. 2 री तील विद्यार्थी चि. शायान ताडे यांस उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले तसेच शाळेच्या विशेष शिक्षिका मनिषा गुंजाळ यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अरविंद सावळेकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती कलावती करवा यांनी आपल्या भाषणात शाळेतील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी व प्रेम असेच कायम राहील असे सुतोवाच केले. संस्थेचे चेअरमन अरविंद सावळेकर यांनी आपल्या भाषणात दिव्यांग मुलांचे तोंडभरून कौतुक केले. दिव्यांग ही भावना विसरुन सर्वसामान्य मुलांप्रमाणेच आहोत असे दाखवून दिले ही खुप मोठी भावना आहे. असे उद्गार काढले.