JNPT च्या वर्धापन दिनीच उरण सामाजिक संस्थेचे आंदोलन.

कायम स्वरूपी सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटलसाठी उरण मध्ये सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळत घर बैठे अनोखे आंदोलन.

उरण प्रतिनिधी दि 26 स्वातंत्र्य काळा पासून उरण तालुका आरोग्य क्षेत्रात पिछाड़ीवर आहे. स्वातंत्र्य मिळून आज 60 वर्षाहुन अधिक वर्षे झाले तरीही उरण मधील नागरिकांना अजूनही आरोग्य सेवेच्या मूलभूत हक्क व अधिकार, सेवा सुविधा मिळालेले नाहीत. करोना सारख्या महाभयंकर रोगानेही उरण मध्ये प्रवेश केला आहे. मात्र उरण मध्ये शासनाचे अत्याधुनिक व सुसज्ज असे एकहि शासकीय हॉस्पिटल नसल्याने उरण मधील नागरिकांना मुंबई, नवी मुंबई मध्ये जाऊन योग्य ते उपचार करून घ्यावे लागतात. मात्र हा उरण मधील जनतेच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार वर्षानुवर्षे चालूच आहे. तेंव्हा उरण मध्ये कायम स्वरूपी सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटल असावे अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने शासनाकडे अनेक वेळा केली आहे. शासन दरबारी याचा अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र शासनाने या समस्याकडे दूर्लक्षच केले. त्यामुळे उरणच्या नागरिकामध्ये शासनाच्या या उदासीन धोरण बाबत खूपच नाराजी पसरली आहे. या सर्व पार्श्वभुमीवर या महत्वाच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी JNPT च्या वर्धापन दिनीच म्हणजेच दि 26/5/2020 रोजी उरण सामाजिक संस्थेने केलेल्या आवाहनानुसार उरण मधील नागरिकांनी आपल्या घरातच बसून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत पोलिस प्रशासनाला सहकार्य करीत एक दिवसाचे अनोखे घर बैठे आंदोलन केले.

उरण तालुक्यात JNPT हे आंतर राष्ट्रीय स्तराचे बंदर आहे. येथील CSR फंडचे करोड़ो रुपये इतर जिल्ह्यातील कामासाठी वापरले जाते. तेच फंड उरण तालुक्यातील सुसज्ज हॉस्पिटल बांधण्यासाठी वापरल्यास उरण मध्ये त्वरित सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटल उभे राहिल मात्र याकडेही JNPT प्रशासन दुर्लक्ष करत आहे. उरण तालुक्यात JNPT बंदराकडे देशाच्या वेगवेगळ्या राज्यातुन दररोज हजारो कंटेनर येतात सदर कंटेनरच्या ड्रायवर, क्लीनर पासून करोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उरण पनवेलच्या वेशीवरच ड्रायवर क्लीनरची करोना तपासणी करावी, JNPT, ONGC,BPCL, CFS गोडावुन येथे बाहेरुन येणाऱ्या कर्मचा-यांची त्या त्या आस्थापनांच्या प्रवेश द्वारावरच व रोजच्या रोज करोना तपासणी करण्यात यावी. JNPT, ONGC, BPCL, CFS गोडावुन आदि कंपन्यांनी त्यांचा अखत्यारित असलेला CSR फंडाचा उपयोग करून उरण तालुक्यात अद्यायावत करोना केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष उभारावे. या सर्व कंपन्यांनी उरण तालुक्यातील रुग्णालयांना एम्बुलेन्स,पीपीई कीट, वेंटिलेटर, मास्क इत्यादि करोना संबंधित साहित्य फ्री मध्ये त्वरित पुरवावित या मागणी सह उरण तालुक्यात कायम स्वरूपी सुसज्ज व अत्याधुनिक असे हॉस्पिटल उभारण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटिल यांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटिल यांनी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला उरण मध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.या घर बैठे आंदोलनामुळे शासनाला आता तरि जाग येईल अशी आशा उरण मधील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *