सोशल डिस्टंन्सिंग व इतर नियमांचे पालन करीत जिल्हयांतर्गत रायगड परिवहन सेवा सुरु
अलिबाग, जि. रायगड, दि. 22 (जिमाका) : जिल्हयात गुरुवार, दि. 21 मे 2020 रोजी पासून रेड झोन आणि प्रतिबंधित क्षेत्र वगळून 50 टक्के आसन क्षमतेसह व इतर शर्तींवर जिल्हयांतर्गत रायगड परिवहन सेवा सुरु करण्यासाठी मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार या जिल्हयामधील प्रमुख मार्गावर प्रवासी उपलब्धतेनुसार सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये शुक्रवार, दि. 22 मे 2020 रोजी पासून रायगड परिवहन वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
यासाठी प्रत्येक प्रवाशाने व रा.प. कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायजरने आपले हात निर्जंतूक करावेत, रा.प.बसमधून प्रवास करण्यासाठी 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच 10 वर्षाखालील मुले यांना अत्यावश्यक वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त प्रवासास अनुमती दिली जाणार नाही, प्रवासामध्ये प्रवाशांनी व रा.प. कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक राहील, असे विभाग नियंत्रक,रा.प. रायगड विभाग, पेण श्रीमती अनघा बारटक्के यांनी कळविले आहे.