पाचजणांच्या उपस्थितीत लग्न करून पाटील कुटुंबियांनी ठेवला आदर्श; ५१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला जमा
पनवेल दि. २१ (वार्ताहर)- कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे, त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व माहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास सांगितले आहे. शासनाच्या या सर्व आदेशाचे तंतोतंत पालन करून आज तालुक्यातील इनामपुरी गावातील पाटील कुटुंबियांनी आज घरातील फक्त पाच ते सहा जणांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने विवाह सोहळा पार पाडला, तसेच लग्नात येणारा खर्च टळल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१हजारांचा धनादेश सुपूर्त केला आहे.
तालुक्यातील इनामपुरी गावातील ह.भ.प. बाळाराम पाटील यांनी जगावर आलेल्या महामारीचे गांभिर्य जाणून आपला नातू म्हणजे तुषार परशुराम पाटील याचे लग्न फक्त पाच लोकांना घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने करून आगरी समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे तसेच समाजसेवक कसा असावा याचे जीवंत उदाहरण दाखवून दिले आहे. या लग्नात वधूवरांना आशिर्वाद देण्यासाठी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी, विभागप्रमुख गणेश म्हात्रे, गजानन बाबूराव पाटील, परशुराम बाबूराव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी वधूवरांनी ५१हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपुर्त केला.