5 लाख 57 हजार रुपये किंमतीच्या विदेशी मद्यसाठ्यांसह दोन गाड्या व 5 जणांना तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः 5 लाख 57 हजार रुपये किंमतीच्या विदेशी मद्यसाठ्यासह दोन महागड्या गाड्या जवळ बाळगल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी 5 जणांविरुद्ध कारवाई केली आहे.
पनवेल परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारुबंदी असतानाही पेण, कर्जत, चौक, रसायनी, खालापूर आदी भागातून वाईन्स शॉपमधून मोठ्या प्रमाणात दारुची खरेदी करून त्याची विक्री करण्यासाठी अलिशान गाड्यांचा वापर करून हे गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेंडूग टोल नाक्याजवळील पोलीस चौकीसमोर सापळा रचून नाकाबंदी करण्यात आली व यामध्ये संशयित पांढर्या रंगाची आय 20 गाडी क्र.एमएच-43-एटी-1078 तसेच राखाडी रंगाची एमएच 03-बीई-508 ही थांबवून यांची झडती घेतली असता सदर गाड्यांमध्ये देशी विदेशी मद्यसाठा मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने या संदर्भात गाडीमधील प्रवाशांना विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने गाडीतील शशिधर सिताराम शेट्टी (45 रा.नेरुळ), प्रवीण डिकोटीयन (42 रा.खारघर), अजित खुपचंदानी (42 रा.कोपरखैरणे), राजेश आर्जेल (37 रा.कोपरखैरणे), सुनील कुन्नीअण्णा शेट्टी (रा.बोनकोडेगाव) यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.